विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळतो आहे. आपल्या सलामीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून मात केली आहे. रविवारी भारताचा सामना माजी विजेत्या ऑस्ट्रेलिया संघासोबत असणार आहे. भारतात क्रिकेटला धर्माचं रुप मिळालं आहे. प्रत्येक सामन्याआधी भारतीय चाहते आपल्या संघाने जिंकावं यासाठी अक्षरशः देवाचा धावा करतात. आपल्या संघाने यंदा विश्वचषक जिंकावा म्हणून कर्णधार विराट कोहलीची शाळा त्याला एक अनोखी भेट देणार आहे.

दिल्लीच्या विशाल भारती पब्लीक स्कूल मध्ये कोहलीचं प्राथमिक शिक्षण झालं आहे. या शाळेची माती विराट कोहलीला इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे. या मातीसाठी विराटने सर्वोत्तम कामगिरी करुन विश्वचषक स्पर्धा जिंकावी अशी अपेक्षा करण्यात आली आहे.

विश्वचषक सामन्यांचं प्रसारण करणाऱ्या Star Sports या वाहिनीने ही वेगळी कल्पना शोधून काढली असून भारतीय संघातील अन्य खेळाडूंनाही त्यांच्या शाळेतली माती पाठवण्यात येणार आहे.

पहिल्या सामन्यात विराटला आपल्या फलंदाजीची फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.