वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाराच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी ब्रायन लाराची अँजिओग्राफी केली. या चाचणीमधून लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अँजिओग्राफीमधून कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता अँजिओप्लास्टीची गरज नाही. विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने ब्रायन लारा मुंबईत आला आहे.

शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लारा एकेकाळी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ होता. लारा आता ५० वर्षांचा आहे. क्रिकेटमध्ये आता तो फारसा सक्रीय नाही. लाराने नव्वदच्या दशकात आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. लाराला बाद करणे भल्या भल्या गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असायचे.

फलंदाजीला मैदानावर आल्यानंतर लाराच्या बॅटमधून नेहमीच धावांचा पाऊस पडायचा. १९९० साली पाकिस्तान विरुद्ध लाहोरमध्ये त्याने वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचवर्षी कराचीमध्येही पाकिस्तान विरुद्ध त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले. कसोटीमध्ये १३१ सामन्यात त्याच्या नावावर ११,९५३ धावा आहेत. ४०० ही कसोटीमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

वनडेमध्ये २९९ सामन्यात त्याने १०,४०५ धावा केल्या. कसोटीमध्ये ३४ शतके ४८ अर्धशतके तर वनडेमध्ये १९ शतके आणि ६३ अर्धशतकं लाराच्या नावावर जमा आहेत. लारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असताना त्याची नेहमीच भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर बरोबर तुलना झाली. लारा सर्वोत्तम की सचिन ही नेहमीच क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा व्हायची. पाकिस्तान विरुद्ध लारा २००६ साली शेवटचा कसोटी सामना खेळला.