बांगलादेश विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची दमदार धुलाई केली. शाय होप (९६), एव्हिन लुईस (७०) आणि शिमरॉन हेटमायर (५०) यांच्या फलंदाजीच्या जोरावर विंडीजने ३२१ धावांपर्यंत मजल मारली आणि बांगलादेशला ३२२ धावांचे आव्हान दिले.

आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला अर्धशतकी सलामी मिळाली. पण सौम्य सरकार २९ धावांवर बाद झाला. त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर तमीम इकबाल चांगली खेळी करत होता. मात्र तो ४८ धावांवर धावबाद झाला. त्याला कॉट्रेलने भन्नाट पद्धतीने बाद केले. पण शाकिब अल हसन याने आपला अनुभव पणाला लावत संयमी खेळी केली. या दरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा गाठला आणि मोठा मैलाचा दगड पार केला.

या कामगिरीसाठी त्याने १९० डाव खेळले. याच सोबत त्याने वीरेंद्र सेहवाग व शिवनारायण चंद्रपॉल यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. तर त्याने युवराज सिंग आणि संगकाराचे विक्रम मोडीत काढला.

त्याआधी, नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर ख्रिस गेल हा शून्यावर परतला. त्याने १३ चेंडू खेळले. पण त्यानंतर एव्हीन लुईसने डावाचा ताबा घेतला आणि शाय होपच्या साथीने डाव सावरला. लुईसने संयमी अर्धशतक केले. पण मोठा फटका मारताना तो ६७ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचले. निकोलस पूरनने फटकेबाजीला सुरुवात केली होती, पण तो २ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३० चेंडूत २५ धावा काढून तो बाद झाला. शिमरॉन हेटमायरने मात्र होपला चांगली साथ दिली. त्याने दमदार अर्धशतक ठोकले. २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार खेचत त्याने ५० धावा केल्या.

शाय होपने मात्र एक बाजू लावून धरली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. आंद्रे रसल शून्यावर माघारी परतल्यानंतर कर्णधार जेसन होल्डर याच्या साथीने होपने डाव पुढे नेला. होल्डरने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण त्याला मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. ४ चौकार आणि २ षटकार लगावत तो १५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. शाय होपने दमदार खेळी केली. पण केवळ ४ धावांनी त्याचे शतक हुकले. १२१ चेंडूत ९६ धावांची संयमी खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. डॅरेन ब्राव्होने अखेरच्या टप्प्यात २ षटकारांच्या सहाय्याने १९ धावा केल्या.

बांगलादेशकडून सैफुद्दीन आणि मुस्तफिजूरने ३-३ तर शाकिब अल हसनने २ गडी बाद केले.