आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस उरले आहेत. ३० मे पासून इंग्लंडमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज या स्पर्धेसाठीच्या बंपर इनामाची घोषणा केली आहे. विश्वचषक विजेत्या संघाला यंदा तब्बल ४० लाख अमेरिकन डॉलर्सचं इनाम घोषित करण्यात आलं आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे किंमत २८ कोटींच्या रुपयात) याचसोबत उप-विजेत्या संघाला २० लाख डॉलर्सचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.

विजेतेपदासाठी घोषणा करण्यात आलेली बक्षिसाची रक्कम ही विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वाधिक रक्कम मानली जात आहे. याचसोबत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला ८ लाख अमेरिकन डॉलरचं इनाम घोषित करण्यात आलं आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ५ जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला यंदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे यंदा कोणता संघ आयसीसीने जाहीर केलेलं इनाम पटकावतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी ICC कडून समालोचकांची यादी जाहीर