पक्षीय राजकारणावर कडाडून टीका

त्यांच्यासाठी कुटुंब आधी, त्यानंतर पक्ष आणि मग देश असा प्राधान्यक्रम आहे. हिमाचल प्रदेश सरकारच्या निर्णयामुळे राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रतिमा मलिन झाली आहे, असा हल्ला बोल बीसीसीआयचे सचिव आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केला.

‘‘एका राज्याच्या निर्णयामुळे देशाचे नाव खराब होऊ नये. राज्यात सत्तेत असलेल्या सरकारच्या वर्तनाने चाहते, प्रायोजक आणि देश म्हणून आपली प्रतिमा डागाळली आहे. हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. दर दिवशी नवनवीन वक्तव्ये देणे ही त्यांची सवयच झाली आहे. आयसीसीच्या स्पर्धेच्या इतिहासात असा प्रकार झाल्याची नोंद नाही. जगातील सौंदर्यपूर्ण स्टेडियममध्ये धरमशालाची गणना होते. स्टेडियममध्ये सर्वसमावेशक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण लढतीसाठी धरमशालाची निवड करण्यात आली होती. सुरक्षा पुरवणे राज्य सरकारच्या हाती आहे. विश्वचषकाचे आयोजन मिळावे यासाठी अनेक राज्ये आतुर असतात. हिमाचल प्रदेशच्या सरकारची भूमिका उलटच आहे. धरमशाला येथे सामना होणार नसल्याने चाहत्यांची मोठय़ा प्रमाणावर निराशा झाली आहे’, असे ठाकूर यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसप्रणीत सरकारने भारत-पाकिस्तान लढतीला सुरक्षेच्या मुद्दय़ावरून साशंकता निर्माण केली. याचीच परिणती भारत-पाकिस्तान लढत धरमशालाऐवजी कोलकाता येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सरकार विरुद्ध भाजपचा खासदार या मुकाबल्यात राज्य सरकारने बाजी मारल्याने बीसीसीआयचे सचिव असलेल्या ठाकूर यांना यजमान नात्याने नामुश्कीला सामोरे जावे लागले.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयचे सचिव असणाऱ्या ठाकूर यांना शक्तिप्रदर्शनाची उत्तम संधी होती. घरच्या मैदानाला भारत-पाकिस्तान लढतीच्या आयोजनाची संधी देण्यात आली. मात्र राजकीय खेळीने त्यांचा पराभव झाला.