आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा भारत-पाकिस्तान सामना धरमशालाऐवजी कोलकात्यात खेळवला जाणार आहे. धरमशाला येथे १९ मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार होता. मात्र, पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव धरमशाला येथे खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा सामना कुठे खेळवायचा याबाबत गेल्या काही दिवसांपासून खलबते सुरू होते. अखेर हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळविण्याचे निश्चित करण्यात आल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रीकेट परिषदेने(आयसीसी) बुधवारी केली.

दरम्यान, पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने धरमशाला येथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी देखील केली होती. त्यानंतर स्पर्धेचे संचालक एम.व्ही.श्रीधर यांनी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर भारत- पाक सामना धरमशाला येथेच होण्याचा आशावाद व्यक्त केला होता. मात्र, आयसीसीने आज पाकिस्तानची मागणी मान्य करत भारत-पाक सामना कोलकाता येथे खेळविण्यात येणार असल्याची घोषणा केली.
पाकिस्तानचा पहिला सामना १६ मार्चला पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडून आलेल्या संघाशी होणार आहे, तर दुसरा सामना भारताविरुद्ध १९ मार्चला पाकिस्तानचा सामना होणार आहे.