आज अफगाणिस्तानशी सामना
कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेच्या निवृत्तीनंतर श्रीलंकेचा संघ संक्रमणातून जात आहे. त्यामुळे गतविजेत्या श्रीलंकेच्या संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही. हीच मरगळ झटकून प्राथमिक फेरीचा अडथळा ओलांडून मुख्य फेरीत आलेल्या अफगाणिस्तानवर मात करणे, हे झगडणाऱ्या श्रीलंकेपुढे आव्हान असेल.
श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिका गमावल्या आहेत. त्यानंतर नुकत्याच झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पध्रेतही श्रीलंकेची कामगिरी खराब झाली होती. मागील १४ सामन्यांपैकी फक्त ४ सामने त्यांना आतापर्यंत जिंकता आले आहेत. त्यामुळे विजयी सलामीसह अभियानाला प्रारंभ करण्यासाठी श्रीलंकेचा संघ उत्सुक आहे.
श्रीलंकेच्या आव्हानांमध्ये भर म्हणजे काही दिवसांपूर्वी लसिथ मलिंगाने कर्णधारपद सोडणे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला मलिंगा पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. अँजेलो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखाली हा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज रंगना हेराथवर श्रीलंकेची मदार असेल.
झिम्बाब्वेला हरवून मुख्य फेरी गाठणाऱ्या अफगाणिस्तानकडून क्रिकेटरसिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अफगाणिस्तानकडे १७ वर्षीय रशीद खान, समिउल्लाह शेनवारी आणि मोहम्मद नबी यांच्यासारखी फिरकी फळी उपलब्ध आहे.

संघ
अफगाणिस्तान : असगर स्टानिकझाई (कर्णधार), मोहम्मद शेहझाद, नूर अली झाद्रान, उस्मान घनी, मोहम्मद नबी, करिम सादिक, शफिकुल्लाह शफिक, रशीद खान, अमीर हमझा, दौलत झाद्रान, शापूर झाद्रान, गुलबदिन नायब, समिउल्लाह शेनवारी, नजिबुल्लाह झाद्रान, हमिद हसन.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, शेहान जयसूर्या, सचित्र सेनानायके, दिनेश चंडिमल, मिलिंदा सिरिवर्धना, चमरा कपुगेद्रा, थिसारा परेरा, निरोशान डिकवेला, रंगना हेराथ, न्यूवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, दुश्मंता चमीरा, दसून शानाका, जेफ्रे वांदरसे.
* स्थळ : इडन गार्डन्स
* वेळ : सायं. ७.३० वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्