कर्णधार शाहिद आफ्रिदीचे मत; सुरक्षेचा धोका जाणवत नाही
सुरक्षेच्या लेखी हमीवरून विश्वचषकातील सहभाग ताणून धरणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतात दाखल झाल्यावर मात्र चाहत्यांच्या प्रेमाचे दाखले देण्यास सुरुवात केली आहे. मायदेशापेक्षा अधिक प्रेम आम्हाला भारतात अनुभवायला मिळते आणि म्हणूनच भारतात कधीही सुरक्षेचा धोका जाणवत नाही, असे मत पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले.
आफ्रिदीचा मुद्दा पुढे रेटताना अष्टपैलू शोएब मलिक म्हणाला, ‘भारत सरकारचे आभार मानतो. सुरक्षाव्यवस्था अतिशय उत्तम आहे. माझी पत्नी भारतीय आहे त्यामुळे मी अनेकदा भारतात येतो. भारत आणि पाकिस्तानमधील लोकांमध्ये मला फारसा फरक जाणवत नाही. आपण सारखेच पदार्थ खातो आणि एकच भाषा बोलतो. भारतात खेळायला मिळणार आहे याचा आनंद आहे. भारतातल्या चाहत्यांकडून नेहमीच प्रेम मिळते. आम्ही क्रिकेटपटू आहोत. सरकारचा निर्णय आमच्यावर बंधनकारक आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात दडपण हाताळणारा संघ विजयी होईल’.
सुरक्षेच्या मुद्दय़ावरून पाकिस्तानच्या संघाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सहभागावरून साशंकता निर्माण झाली होती. केंद्र सरकारच्या सुरक्षेबाबतच्या लेखी हमीनंतर पाकिस्तानचा संघ शनिवारी रात्री भारतात दाखल झाला. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील लढत धरमशाला येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी सामन्यासाठी सुरक्षा पुरवण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर पाकिस्तानतर्फे दोन सदस्यीय शिष्टमंडळाने भारतातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि त्यांच्या अहवालानुसार भारताविरुद्धची लढत धरमशाला येथून कोलकाता येथे स्थलांतरित करण्यात आली.

भारतात खेळताना जेवढा आनंद मिळतो तेवढा जगात कुठेच मिळत नाही. मी कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. मी जगभरात क्रिकेट खेळलो आहे पण भारतासारखे चाहत्यांचे प्रेम माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहील. मायदेशातही आम्हाला एवढे प्रेम मिळत नाही. क्रिकेटप्रेमी चाहत्यांची संख्या पाकिस्तानच्या तुलनेत भारतात प्रचंड आहे. म्हणूनच भारतात खेळण्यासारखा आनंद नाही.
-शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान संघाचा कर्णधार