क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. इथे कोणत्या क्षणी कोणाचे पारडे जड होईल, याचा अंदाज बांधणे अवघडच. त्यात ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या झटपट प्रकारामुळे असे प्रसंग पटापट आपल्या डोळ्यांसमोर घडतात. प्रत्येक चेंडूवर गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करणारा फलंदाज हे साधारण समीकरण ट्वेन्टी-२० प्रकारात आपल्यासमोर उभे राहते, परंतु अनेकदा गोलंदाजांनीही एका षटकात सामन्याचे चित्र पालटलेले पाहिले आहे. त्यामुळे कधी कोण चमकेल, याचा अंदाज बांधणे अवघडच. मंगळवारपासून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या मुख्य फेरीला सुरुवात होत आहे आणि या रणसंग्रामात कोणते खेळाडू आपली छाप पाडतील, यावर टाकलेली नजर..

डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा हा सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि अ‍ॅडम गिलख्रिस्टची आठवण करून देतो. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणारी वॉर्नरची वृत्ती संघाच्या फायद्याची आहे. बिनधास्त-बेधडक अशी वॉर्नरची ओळख करून द्यायला हरकत नाही. त्यात भारतीय खेळपट्टीवर खेळण्याचा पुरेसा अनुभव त्याच्यापाशी असल्यामुळे तो प्रतिस्पर्धीसाठी डोकेदुखी ठरू शकतो. जलद माऱ्याचा अगदी सहज सामना करण्याबरोबर फिरकीवर तंत्रशुद्ध फटके मारण्याची कला त्याने अनुभवातून शिकली आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १३० धावा करून मालिकावीराचा किताब पटकावला.

विराट कोहली
चतुर, परिस्थितीशी समरूप होणारा आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणारा फलंदाज अशी भारतीय संघातील विराट कोहलीची ओळख. जगातील कोणत्याही खेळपट्टीवर सातत्याने धावा करण्याची कला त्याच्याकडे आहे.
अगदी सहज वाटणारे फटके खेळणे, हेच त्याचे बलस्थान आहे. त्यात हा विश्वचषक भारतात होणार असल्याने त्याची बॅट जणू धावांचे इमले रचेल. मागील आठ ट्वेटी-२० सामन्यांमधील विराटच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्याने चार अर्धशतकांसह ३५२ धावा चोपल्या आहेत. धावांचा पाठलाग करण्याचे असलेले कौशल्य हेच त्याच्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवते.
खेळपट्टी आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन खेळात बदल करण्याचे कसब त्याच्याकडे आहे.

ग्रँट इलियट
२०१५च्या एकदिवसीय विश्वचषक स्पध्रेतील न्यूझीलंडच्या या नायकाकडे झटपट प्रकारात दुर्लक्ष करून चालणारे नाही. इलियटच्या अमूल्य कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्यांदा विश्वचषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तंत्रशुद्ध फलंदाज आणि तितकाच अचूक मारा करणारा गोलंदाज अशी त्याची खासियत. ब्रेंडन मॅक्क्युलमच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास इलियट सक्षम ठरू शकतो. फलंदाजीत आलेल्या अपयशाची भरपाई गोलंदाजीतून करण्याची कौशल्यही त्याच्याकडे आहे.

ख्रिस गेल
एखादी सुनामी यावी आणि सारे काही उद्ध्वस्त करावे, अशी ख्रिस गेलची ओळख करून द्यायला हवी. फलंदाजीचा तंत्रशुद्ध फटका त्याच्या नोंदवहीत नसावा. चेंडू आला की तलवारीसारखी बॅट फिरवायची आणि चेंडू सीमापार भिरकावून द्यायचा, हेच त्याचे ध्येय. म्हणूनच गोलंदाजांनी कसाही चेंडू टाकला आणि तो गेलच्या बॅटच्या संपर्कात आला की तो सीमापार हे निश्चित. फिरकीवर खेळताना तारांबळ उडत असली तरी त्यावरही त्याने अनेकदा मात केलेली आहे. ट्वेटी-२० प्रकारातील जलद शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत तो चौथा येतो. हा ट्वेन्टी-२० विश्वचषक त्याच्या कारकीर्दीचा अखेरचा विश्वचषक असल्यामुळे गेल‘वादळ’ रसिकांना अनुभवायला मिळेल.

तिलकरत्ने दिलशान
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेसाठी जाहीर झालेल्या श्रीलंकेच्या संघात अनुभवी खेळाडू म्हणून तिलकरत्ने दिलशान आणि लसिथ मलिंगा यांची नावे पुढे आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही; पण त्यातल्या त्यात दिलशानकडे सर्वाचे अधिक लक्ष असेल. तंत्रशुद्ध फलंदाजी आणि विविध फटक्यांचा शोध लावण्याचे कौशल्य त्याकडे आहे. त्यात भारतीय खेळपटय़ांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे तो छाप नक्की पाडेल.

महमदुल्लाह
मश्रफी मुर्तझा, शकिब अल हसन, मुशफिकर रहीम, सब्बीर रहमान आदी एकाहून एक खेळाडूंच्या मांदियाळीतही महमदुल्लाहने आपले छाप पाडली आहे. शकिब या अनुभवी अष्टपैलू खेळाडूनंतर महमदुल्लाहचे नाव घेतल्यास काही वावगे ठरणार नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याचे योगदान कौतुकास्पद आहे. गेल्या आठ सामन्यांत १८५ धावा आणि चार बळी ही त्याची कामगिरी सर्वसाधारण वाटत असली तरी मोक्याच्या क्षणी संघाला तारणारी ही खेळी आहे.

मोईन अली
भारतातून आम्ही विश्वचषक जिंकून मायदेशी नेणार, हे टे्वन्टी-२० विश्वचषक स्पध्रेपूर्वी झालेल्या सराव सामन्याआधीचे मोईन अलीचे वाक्य त्याचा आत्मविश्वास दर्शवतो. इंग्लंडचा हा अष्टपैलू खेळाडू फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही दमदार कामगिरी करण्याची क्षमता राखतो. भारतातील फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर त्याच्याकडून सर्वोत्तम गोलंदाजी झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

ए बी डी’व्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाचे आता सर्वत्र गुणगान होत आहे. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू अगदी सहजपणे धाडण्याची कला त्याच्याकडे अवगत आहे. हूक, पूल, पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्ट्रेट ड्राइव्ह हे पारंपरिक फटके मारण्याची क्षमता त्याच्यात आहेच, परंतु या पलीकडे नवीन फटक्यांची आतषबाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अचंबित करण्यात तो पारंगत आहे.

शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानी संघाचा चिरतरुण कर्णधार शाहिद आफ्रिदी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रकारांत करिश्मा दाखवण्याचा दम राखतो. सध्या त्याची फलंदाजी बहरात नसली तरी कोणत्याही क्षणी तो फॉर्म मिळवू शकतो आणि तो क्षण प्रतिस्पर्धी संघांसाठी घातकच असेल.