विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यात बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. या विजयासह भारताने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतही निर्भेळ यश संपादन केलं. भारतीय संघाच्या या विजयामुळे त्यांच आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेतलं स्थान अधिक बळकट झालेलं आहे. भारत सध्या ३६० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये ७ विजय मिळवले आहेत.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या ३ क्रमांकाचे संघ पुढीलप्रमाणे –

१) भारत – ७ सामन्यांत ७ विजय – ३६० गुण

२) ऑस्ट्रेलिया – ६ सामन्यात ३ विजय, २ पराभव आणि १ अनिर्णित – ११६ गुण

३) न्यूझीलंड – २ सामन्यात १ विजय, १ पराभव – ६० गुण

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा सलग सातवा विजय ठरला आहे. याचसोबत कसोटीत सलग ४ सामने डावाने जिंकण्याचा मानही भारतीय संघाला मिळाला आहे. याआधी २०१३ साली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सलग ६ विजयांची नोंद केली होती. २०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकेला सामोरं जावं लागणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार, मालिकेतही मारली बाजी