भारतीय संघाने यजमान विंडिज संघाला मोठ्या फरकाने पराभूत करत ICC World Test Championship Points Table मध्ये अव्वल स्थान पटकावले. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. त्यामुळे भारतीय संघाने ICC World Test Championship च्या गुणतालिकेत आपले खाते उघडले. इतकेच नव्हे तर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

भारत-विंडिज सामन्यानंतर ही गुणतालिका अपडेट केली आहे

 

ICC World Test Championship या स्पर्धेत नियमानुसार एका मालिकेसाठी १२० गुण ठरवण्यात आले आहेत. भारताची विंडिजविरूद्धची कसोटी मालिका ही २ सामन्यांची आहे, त्यामुळे या मालिकेत १ सामना जिंकणाऱ्या संघाला ६० गुण देण्यात येणार आहेत, तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन संघांना २०-२० गुण वाटून देण्यात येणार आहेत. त्यानुसार भारताला पहिल्या विजयानंतर ६० गुण देण्यात आले आणि भारताला अव्वल स्थान देण्यात आले.

भारतासह श्रीलंकेचेही या गुणतालिकेत ६० गुण आहेत. पण भारताने विंडिजवर मिळवलेला विजय श्रीलंकेने न्यूझीलंडने मिळवलेल्या विजयापेक्षा मोठा आहे त्यामुळे भारताला अव्वल क्रमांक देण्यात आला आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात श्रीलंका पराभवाच्या छायेत आहे, त्यामुळे सध्या तरी भारताला अव्वलस्थानी नाही.

याचसोबत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत ३ सामने पूर्ण झाले आहेत. या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोघांनी १-१ सामना जिंकला असून १ सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे या गुणतालिकेत दोन्ही संघांचे ३२ गुण आहेत. विजयी सामन्याचे २४ आणि अनिर्णित सामन्याचे ८ गुण असे मिळून हे गुण देण्यात आले आहेत.