उमर अकमलची शानदार अर्धशतकी खेळी आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रतिहल्ल्यानंतरच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने बलाढय़ ऑस्ट्रेलियावर १६ धावांनी मात केली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र उमर अकमलने ९४ धावांची शानदार खेळी करत पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. कामरान अकमलने ३१ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. यानंतर मात्र उमरला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. उमरने ९ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ चेंडूत ९४ धावांची खणखणीत खेळी केली. या खेळीच्या जोरावरच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर १९२ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले.  
या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली. डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन प्रत्येकी ४ धावा करून तंबूत परतले. मात्र यानंतर आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०.४ षटकांत ११८ धावांची तुफानी भागीदारी केली. या भागीदारीमुळे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या आवाक्यात असल्याचे चित्र होते. मात्र शाहिद आफ्रिदीने मॅक्सवेलला बाद करत ही जोडी फोडली. मॅक्सवेलने ३३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. ही जोडी फुटताच ऑस्ट्रेलियाच्या डावाची घसरगुंडी उडाली. फिंचने एकहाती सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सामन्याचा निकाल पालटवला. ९४ धावांची खेळी करत पाकिस्तानच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या उमर अकमलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १९१ (उमर अकमल ९४, कामरान अकमल ३१, नॅथन कोल्टिअर निल २/३६) विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया : २० षटकांत सर्वबाद १७५ (ग्लेन मॅक्सवेल ७४, आरोन फिंच ६५, झुल्फिकार बाबर २/२६, उमर गुल २/२९)
सामनावीर : उमर अकमल.