पाकिस्तानला चीतपट करत दणक्यात सलामी देणाऱ्या भारतीय संघाने रविवारी गतविजेत्या वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत खणखणीत विजयाची नोंद केली. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो अशा धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असलेल्या वेस्ट इंडिजला भारताने प्रभावी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर १२९ धावांवर रोखले. हे आव्हान पेलताना पहिल्याच षटकात शिखर धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दोन सामन्यातील दोन विजयांसह भारताचे ४ गुण झाले असून, त्यांची पुढची लढत २८ मार्चला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य मिळालेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात जोरदार धक्का बसला. सॅम्युएल बद्रीच्या गोलंदाजीवर शिखर धवन भोपळाही न फोडता बाद झाला. मात्र यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार-षटकारांची अचूक सांगड घालत दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलने कोहलीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ५४ धावा केल्या. खराब फॉर्मशी झगडणाऱ्या युवराज सिंगने सामान्य दर्जाचा खेळ करत भारताचा विजय लांबवला. १९ चेंडूत १० धावा करून तो बाद झाला. सुरेश रैनाने विजयी चौकार खेचत भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. रोहित शर्माने ५५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली. मिश्राला सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज असतानाही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताच्या फिरकी त्रिकूटासमोर शरणागती पत्करली. मिश्रा, अश्विन आणि जडेजा या भारताच्या फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजच्या डावाला सुरूंग लावत त्यांना ७ बाद १२९ धावांवर रोखले. ख्रिल गेलने ड्वेन स्मिथसह सावध सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७.४ षटकांत ३८ धावा केल्या. त्यानंतर मिश्राने सॅम्युएल्स (१८) आणि ड्वेन ब्राव्हो (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत विंडीजला अडचणीत आणले. त्यानंतर जडेजाने तीन बळी मिळवत वेस्ट इंडिजला जखडून ठेवले.

संक्षिप्त धावफलक :
वेस्ट इंडिज : २० षटकांत ७ बाद १२९ (ख्रिस गेल ३४, लेंडल सिमन्स २७, रवींद्र जडेजा ३/४८, अमित मिश्रा २/१८) पराभूत विरुद्ध भारत : १९.४ षटकांत ३ बाद १३० (रोहित शर्मा ६२, विराट कोहली ५४, आंद्रे रसेल १/१२).
सामनावीर : अमित मिश्रा.