झिम्बाब्वे, अफगाणिस्तान यांचे विजय

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठीचे प्रबळ दावेदार झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांनी आपापल्या लढतीत विजय मिळवला. दुसरीकडे दोन लढतींमध्ये दोन पराभवांमुळे हाँगकाँग आणि स्कॉटलंडचे  आव्हान संपुष्टात आले.

अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर खेळताना हाँगकाँगला प्रथम फलंदाजी करताना ११६ धावांचीच मजल मारता आली. अंशुमन रथने सर्वाधिक २८ धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद नबीने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणिस्तानने ४ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. मोहम्मद शहझाद आणि नूर अली झाद्रान यांनी ७० धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. ही जोडी फुटल्यानंतरही अन्य फलंदाजांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मोहम्मद नबीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

दरम्यान, दुपारी झालेल्या लढतीत झिम्बाब्वेने स्कॉटलंडवर ११ धावांनी मात केली. झिम्बाब्वेच्या १४७ धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १३६ धावांवरच माघारी परतला. चार बळी घेणाऱ्या मसकाझाला सामनावीराचा मान मिळाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेची खराब सुरुवात झाली, परंतु शॉन विल्यम्सने एका बाजूने खिंड लढवत संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. विल्यम्सने ३६ चेंडूंत ६ चौकारांसह ५३ धावांची  खेळी केली. त्याला रिचमंड मुतुंबामी आणि एल्टन चिगुंबुरा यांनी साजेशी साथ दिली. त्यामुळे झिम्बाब्वेने निर्धारित २० षटकांत ७ बाद १४७ धावा केल्या.