विश्वचषक स्पर्धा १९९९ मध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिलेल्या झिम्बाब्वे क्रिकेट संघाला आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोठा दणका दिला आहे. ICC च्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेटवर तत्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या ICC च्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेत होत असलेल्या अनियमितता लक्षात घेत ICC च्या सभेत एकमताने हा निर्णय झाला.

“ICC चे पूर्णकालीन सदस्यत्व प्राप्त असलेल्या झिम्बाब्वेला क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेणे शक्य झाले नाही. त्यांच्या क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकांमध्ये तेथील सरकारचा हस्तक्षेप असू नये अशी आत होती, पण तेदेखील झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला शक्य झालेले नाही”, असे ICC च्या गुरुवारी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला ICC कडून मिळणारा निधी रोखण्यात येणार आहे. तसेच ICC च्या कार्यक्रमांमध्येही त्यांना उपस्थित राहता येणार नाही.

“आम्ही (ICC) कोणत्याही संघाच्या सदस्यत्वाबाबतचा निर्णय अतिशय गांभीर्याने घेतो. आम्हाला खेळ आणि राजकारण यांच्यात फरक ठेवायचा आहे. खेळात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे”, असे याबाबत बोलताना ICC चे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले.