आइसलॅण्ड आणि झेक प्रजासत्ताक संघांनी पुढील वर्षी होणाऱ्या युरो चषक फुटबॉल स्पध्रेत प्रवेश निश्चित केला आहे. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या या आइसलॅण्ड देशाने युरो चषकाची पात्रता मिळवून इतिहास घडविला. युरो चषक पात्रता फेरीत आइसलॅण्डने कझाकस्तानला गोलशून्य बरोबरीत रोखून ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले.
आठ सामन्यांत सहा विजय आणि प्रत्येकी एक एक पराभव व अनिर्णित निकालावर समाधान मानणाऱ्या आइसलॅण्डने ‘अ’ गटात १९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. युरो चषक स्पध्रेसाठी पात्र ठरण्याकरिता त्यांना केवळ एका गुणाची आवश्यकता होती आणि कझाकस्तानला गोलशून्य रोखून त्यांनी तो कमावला. मात्र, आइसलॅण्डचा कर्णधार अ‍ॅरोन गुन्नार्सोन याने सामना ८९व्या मिनिटाला जल्लोष केल्याने त्याला लाल कार्ड दाखविण्यात आले.
याच गटातून झेक प्रजासत्ताकने १९ गुणांसह दुसरे स्थान पटकावून युरोतील स्थान निश्चित केले. डेव्हिड लिम्बेस्र्की (१३ मि.) आणि व्लॅडिमीर डॅरिडा (२५ मि.) यांच्या गोलच्या बळावर झेकने २-१ अशा फरकाने लॅटव्हिआवर विजय मिळवला. लॅटव्हियाकडून अ‍ॅरतुर्स झुझिन्स (७३ मि.) याने एकमेव गोल केला. दरम्याऩ, याच गटात असलेल्या नेदरलॅण्डचा युरो प्रवेश अनिश्चिततेच्या सावटाखाली आला आहे. प्रशिक्षक डॅनी ब्लाइंड यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या नेदरलॅण्डला सलग दुसरा पराभव पत्करावा लागल्याने १९८४नंतर पहिल्यांदा युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेतून बाहेर होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या नेदरलॅण्डला ०-३ अशा फरकाने टर्कीने नमवले. ओगुझ्ॉन ओझीकुप (८ मि.), अ‍ॅर्डा तुराण (२६ मि.) आणि बराक यिल्माझ (८६ मि.) यांच्या आक्रमक खेळाने नेदरलॅण्डला हतबल केले. ‘‘पुन्हा एकदा आम्हाला चांगला खेळ करण्यात अपयश आले. गोल करण्याची सोपी संधी गमावल्यानंतर आपण स्वत:हून परिस्थिती किचकट करून घेतो,’’ अशी प्रतिक्रिया ब्लाइंड यांनी दिली.

आजचे सामने
इंग्लंड विरुद्ध स्वित्र्झलड
एफव्हायआर मॅकेडोनिआ विरुद्ध स्पेन
स्वीडन विरुद्ध ऑस्ट्रिया
वेळ : मध्यरात्री १२.०५ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स एचडी, सोनी किक्स आणि सोनी सिक्स एसडी

वेल्स संघाची प्रतीक्षा वाढली
१९५८च्या विश्वचषक स्पध्रेनंतर पहिल्यांदा महत्त्वाच्या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या वेल्स संघाना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘ब’ गटातील या लढतीत त्यांना इस्राइलविरुद्ध गोलशून्य निकालावर समाधान मानावे लागल्यामुळे त्यांचा युरो प्रवेश लांबणीवर गेला आहे. त्यांना युरोप्रवेशासाठी एका गुणाची आवश्यकता आहे. याच गटात बेल्जियमने १-० अशा फरकाने साप्रसवर विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले आहे. ८६व्या मिनिटाला इडन हजार्डच्या गोलने बेल्जियमला विजय मिळवून दिला.