‘अनहोनी को होनी कर दे धोनी..’ हे गाणे भारतीय क्रिकेटरसिकांना आता तोंडपाठ झाले आहे. कठीण समय येता धोनी नेहमी शांत डोक्याने परिस्थिती हाताळून भारतीय क्रिकेटला एकेक शिखर सर करून देतो, हे तर परवलीचेच. गुरुवारी पोर्ट ऑफ स्पेनला जे घडले, ते अविश्वसनीय असेच होते. एखाद्या मनोवेधक कादंबरीच्या तितक्याच उत्कंठावर्धक शेवटाप्रमाणे धोनीने भारताच्या पराजयाचे विजयात रूपांतर करून दाखवले. दुखापतीमुळे या आधीच्या काही सामन्यांमध्ये खेळू न शकलेला धोनी अंतिम सामन्यात परतला. गुरुवारची मध्यरात्र सरत चालली होती आणि शुक्रवारच्या पहाटे धोनीने आपल्या परिसस्पर्शाने आणखी एक भेट समस्त भारतीयांना दिली. अखेरच्या षटकात भारताला १५ धावांची आवश्यकता असताना धोनीने दोन षटकार आणि एक चौकार खेचत भारताला एक विकेट आणि दोन चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला.
भारताने त्याआधी श्रीलंकेचा डाव फक्त २०१ धावांत गुंडाळण्याची किमया साधली. त्यानंतर अत्यंत नाटय़मय लढतीत धोनीने ५२ चेंडूंत ४५ धावांची झुंजार खेळी साकारली. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला आणि तिरंगी चषकावर आपला हक्क प्रस्थापित केला. इंग्लिश भूमीवर श्रीलंकेलाच हरवून प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स करंडक जिंकणाऱ्या भारताने कॅरेबियन भूमीवर आणखी एक जेतेपद नावावर केले.
भारताच्या विजयाचा पाया रचला तो सलामीवीर रोहित शर्माने. त्याने पाच चौकार आणि एका षटकारासह ८९ चेंडूंत ५८ धावा केल्या. मग रैनाने २७ चेंडूंत ३२ धावा करताना भारताच्या धावसंख्येला वेग आणून दिला. शिखर धवन आणि विराट कोहलीने निराशा केली. परंतु रोहितने दिनेश कार्तिकसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. मग रोहितने रैनासोबत ८ षटकांत ६२ धावांची भागीदारी केली. हेराथच्या एका कमी उंचीवरील चेंडूने रोहितचा त्रिफळा भेदला.
३५व्या षटकात सुरैश रैना बाद झाला, तेव्हा भारताच्या ५ बाद १४५ धावा झाल्या होत्या. पण धोनीने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत पाच चौकार आणि दोन षटकारांची बरसात केली. एकीकडे श्रीलंकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज रंगना हेराथ भारताला हादरे देत असताना धोनीने शांतपणे आणि धूर्तपणे आपली खेळी उभारली.

एक झुंज वादळाशी..
अँजेलो मॅथ्यूजच्या ४७व्या षटकात विनय कुमार बाद झाला, तेव्हा भारताला २२ चेंडूंत २० धावांची आवश्यकता होती. कप्तान महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर तग धरून होता. आणखी एका जेतेपदाचे स्वप्न त्याला साध्य करायचे होते. भारताचा ११वा फलंदाज इशांत शर्मा मैदानावर आला. ट्रेंट ब्रिजला चालू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत अ‍ॅश्टन अगर आणि फिलिप या दहाव्या जोडीने पराक्रम दाखवला. पोर्ट ऑफ स्पेनलाही धोनी आणि इशांत शर्मा या अखेरच्या जोडीवर भारताच्या विजयाची जबाबदारी होती. ४८वे लसिथ मलिंगाचे आणि ४९वे मॅथ्यूजचे षटक श्रीलंकेच्या आशा उंचावणारे आणि भारताला पराभवाच्या दारी नेणारे ठरले. या दोघांनीही आपापल्या षटकांमध्ये प्रत्येकी दोन धावा दिल्या.
अखेरच्या षटकात भारताला १५ धावांची आवश्यकता होती. सुदैवाने धोनी स्ट्राइकला होता. इशांतला आधीच दोनदा जिवदान लाभले होते. त्यामुळे भारताचा पराभव पक्का मानला जात होता. पण धोनी खचला नाही. सर्वप्रथम त्याने फटकेबाजीसाठी योग्य अशी आपली वजनदार बॅट मागवली. मुरली विजय आणि अंबाती रायुडू आपल्या संघनायकासाठी ती घेऊन आले. मग ‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने आश्चर्यकारक पद्धतीने पराजयाचे विजयात रूपांतर केले. शमिंदा इरंगाच्या

अखेरच्या षटकात असे नाटय़ घडले

४९.१
सर्वाच्या नजरा धोणीवर खिळल्या होत्या. इरंगाच्या ऑफ स्टंपपासून खूप बाहेर जाणाऱ्या चेंडूवर धोनीला एकही धाव घेता आली नाही. धोनीने बॅट तर सरसावली, परंतु चेंडूला बॅटचा स्पर्शही झाला नाही.

४९.२
इरंगाच्या पुढच्याच चेंडूवर धोनीने जोरदार आक्रमण केले. चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून बंदुकीच्या गोळीप्रमाणे थेट सीमारेषेपलीकडील छपरावर पडला. भारताच्या आशा उंचावणारा हा षटकार ठरला.

४९.३
इरंगाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीने अंदाज घेत पॉइंटवर उभ्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार खेचला. धोनी भारताला जिंकून देऊ शकतो, हा आशावाद प्रगल्भ झाला. चेंडू ३ आणि धावा ५ असे सोपे समीकरण उरले.

४९.४
चौथ्या चेंडूवर धोनीने पुन्हा एक चमत्कार करून दाखवला. क्रिकेटमध्ये अशक्यप्राय काहीच नसते, हे सिद्ध करीत धोनीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार खेचला.. आणि अविश्वसनीय विजय भारताला मिळवून दिला.

धावफलक
श्रीलंका : ४८.५ षटकांत सर्व बाद २०१ (कुमार संगकारा ७१, लाहिरू थिरीमाने ४६; रवींद्र जडेजा ४/२३) पराभूत वि. भारत : ४९.४ षटकांत ९ बाद २०३ (रोहित शर्मा ५८, सुरेश रैना ३२, महेंद्रसिंग धोनी नाबाद ४५; रंगना हेराथ ४/२०).
सामनावीर : महेंद्रसिंग धोनी. मालिकावीर : भुवनेश्वर कुमार.

क्रिकेटविषयक चांगल्या जाणिवेचे वरदान मला लाभले आहे -धोनी
पोर्ट ऑफ स्पेन : भारताच्या विजयाच्या आशा मावळू लागल्या होत्या, तेव्हा कप्तान महेंद्रसिंग धोनीने चमत्कार घडवला. कठीण परिस्थितीत संयमाने खेळत धोनीने पराभवाचे रूपांतर विजयात केले. क्रिकेटविषयक चांगल्या जाणिवेचे वरदान लाभल्यामुळे आपल्याला हे शक्य झाल्याचे धोनीने सांगितले. ‘‘क्रिकेटविषयक चांगल्या जाणिवेचे वरदान मला लाभले आहे, असे मला वाटते. अखेरच्या षटकात मी १५ धावा करू शकेन याची मला खात्री होती आणि ते प्रत्यक्षात साकारल्याचा मला अतिशय आनंद होतो आहे,’’ असे धोनीने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. अखेरच्या षटकात धोनीने वजनदार बॅट वापरली, त्यामुळे मोठे फटके खेळणे सोपे गेले. धोनीने आपल्या नाबाद ४५ धावांच्या खेळतील १६ धावा अखेरच्या षटकात काढल्या. याविषयी धोनी म्हणाला, ‘‘वजनदार बॅट फटकेबाजीसाठी योग्य होती. त्यामुळेच मी तिचा वापर केला.’’

विजेत्या संघाला चषक देण्यास निवेदक विसरला
पोर्ट ऑफ स्पेन : तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने श्रीलंकेवर थरारक विजय मिळवला. मात्र सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय संघाला जेतेपदाचा चषक देण्यासाठी निमंत्रित करायला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवेदक अरुणलाल विसरले. याबाबत आठवण करून दिल्यानंतर अरुणलाल यांनी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रभारी कर्णधार विराट कोहलीला चषक स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. धोनीने हंगामी कर्णधार विराट कोहलीच्या साथीने चषक स्वीकारला.

कोहलीची तिसऱ्या स्थानावर झेप
दुबई : आयसीसी क्रिकेट क्रमवारीत भारताच्या विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवणारा तो भारतीय फलंदाज आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्रमवारीत एका क्रमांकाने घसरण झाली असून तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तिरंगी मालिकेत सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावणाऱ्या भुवनेश्वर कुमारने अव्वल २० गोलंदाजांमध्ये स्थान पटकावले आहे. तो २०व्या स्थानी आहे. फिरकीपटू रवींद्र जडेजा सर्वोत्तम पाचव्या स्थानी आहे. चॅम्पियन्स करंडकापाठोपाठ तिरंगी मालिका जिंकणाऱ्या भारताने सांघिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे.

धोनी सर्वोत्तम ‘फिनिशर’-वेंगसरकर
मुंबई : मी पाहिलेल्यांपैकी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या क्षणी चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देणारा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी धोनीची स्तुती केली. ते म्हणाले, ‘‘सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने कडवी लढत देऊन जेतेपदावर नाव कोरले. कठीण क्षणी धोनी कधीही डगमगून जात नाही. त्याची नेतृत्वक्षमता वाखाणण्याजोगी आहे.’’

अँजेलो मॅथ्यूजवर दोन सामन्यांची बंदी
पोर्ट ऑफ स्पेन : तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत षटकांची गती कमी राखल्याबद्दल श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजवर दोन सामन्यांच्या बंदीची शिक्षा ओढवली आहे. अन्य खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून ४० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी ही शिक्षा सुनावली. श्रीलंकेचा संघ निर्धारित वेळेपेक्षा ३ षटके मागे होता. या बंदीमुळे मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमध्ये मॅथ्यूज खेळू शकणार नाही.

अविश्वसनीय विजय. महेंद्रसिंग धोनीची आणखी एक शानदार खेळी. दोन चषकांसह मायदेशी परतत आहोत.
सुरेश रैना

थरारक विजय. धोनीचा अफलातून खेळ. चॅम्पियन्स करंडकानंतर दोन महिन्यांच्या दौऱ्याचा शानदार शेवट धोनीने केला.
रवीचंद्रन अश्विन

भन्नाट विजय. दोन झळाळत्या चषकांसह भारतात येत आहोत. आम्ही विजेते आहोत.
रवींद्र जडेजा
बाय बाय वेस्ट इंडिज. अनेक अविस्मरणीय आठवणींसह मायदेशी परतत आहे. दोन महिन्यांच्या क्रिकेटनंतर आता अतिआवश्यक असलेल्या विश्रांतीची वेळ आली आहे.
महेंद्रसिंग धोनी

मित्रांनो, जबरदस्त कामगिरी. शानदार विजयासह तिरंगी मालिकेच्या जेतेपदावर कब्जा. तुम्ही या चषकाचे खरे दावेदार आहात. असेच यश मिळवत राहा.
गौतम गंभीर