कराची : संघातील काही खेळाडू मी हिंदू धर्माचा असल्यामुळे शेरेबाजी नक्कीच करायचे; परंतु त्यांनी कधीही माझ्यावर धर्म बदलण्यासाठी दडपण आणले नाही अथवा माझ्या मनातही तसा विचार कधीच उद्भवला नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने व्यक्त केली.

निकालनिश्चितीप्रकरणी दोषी आढळल्यामुळे कायमस्वरूपी निलंबनाची शिक्षा लादण्यात आलेल्या कनेरियाविषयी पाकिस्तानचाच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने गुरुवारी वादग्रस्त विधान केले होते. ‘‘कनेरिया हा हिंदू धर्माचा असल्यामुळे पाकिस्तानच्या संघातील अनेक खेळाडू त्याच्याशी बोलणे टाळायचे अथवा भोजनाच्या वेळी त्याच्याहून दूर बसायचे,’’ असे अख्तर म्हणाला होता. कनेरियाने अख्तरचे म्हणणे सत्य असल्याचे मान्य केले असले तरी संघातील खेळाडूंचाही त्याने बचाव केला आहे.

‘‘माझ्यावर संघातील काही खेळाडूंकडून नक्कीच चर्चा रंगायची. त्याशिवाय मी हिंदू असल्यामुळे माझ्यावर ते अनेकदा विनोदही करायचे; परंतु मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. किंबहुना त्यांच्या वागणुकीला वैतागून धर्म बदलावा, असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. मी हिंदू असल्याचा जितका मला अभिमान आहे, तितकेच पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केल्याचेही मला समाधान आहे,’’ असे ३९ वर्षीय कनेरिया म्हणाला.