यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी आम्ही आता प्ले ऑफ लढतींचा विचार करीत नसून आम्ही पुढील दोन लढतींवरच लक्ष केंद्रित केले असल्याचे अष्टपैलू कृणाल पंडय़ाने सांगितले.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी आयपीएलच्या प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे. अन्य दोन जागांसाठी पाच संघांमध्ये चुरस आहे. त्यात १२ सामन्यांमधून १४ गुण मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तृतीय स्थानी आहे. मुंबई संघाला गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबादशी झुंजायचे आहे. हैदराबादचा संघ १२ सामन्यांमधून १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्ले ऑफचे स्थान मिळवण्याची झुंज असल्याने या सामन्यात प्रचंड चुरस राहणार आहे.

‘‘१२ सामने खेळल्यानंतर आमचा संघ प्ले ऑफच्या जवळ पोहोचलेला आहे. ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. मात्र, अद्याप दोन सामने बाकी असून त्यावरच आम्ही आमचे लक्ष एकाग्र केले आहे.

या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करायची एवढेच आम्ही सध्या तरी ठरवले आहे. त्यानंतर मग प्ले ऑफमध्ये कसे खेळायचे त्याबाबत आम्ही विचार करु,’’ असेही कृणालने नमूद केले. कृणालने यंदाच्या वर्षभरात १२ सामन्यांमध्ये ८ बळी आणि १६७ धावा केल्या आहेत. एका कार्यक्रमासाठी कृणाल, क्विंटन डीकॉक आणि इशान किशन कुर्ला येथे आले होते, त्यावेळी ते बोलत होते. गुरुवारच्या सामन्यानंतर मुंबईचा संघ रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे.