‘‘भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यातील एका क्षणी आम्ही सहज हरलो असतो. त्यामुळे केव्हा आणि कशी गोलंदाजी करायची? याचे धडे आमच्या गोलंदाजांना या सामन्यातून मिळाले,’’ असे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.
भारतीय संघाने ज्या पद्धतीने लढत दिली त्याबाबत धोनीने समाधान प्रकट केले आहे.
धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला सामन्याच्या तयारीसाठी जो वेळ मिळाला, हे ध्यानात ठेवले तर संघाच्या कामगिरीबाबत मी आनंदी आहे. काही एकदिवसीय सामन्यांमुळे वातावरणाचा प्राथमिक अनुभव आम्हाला मिळाला.’’
तसेच ‘‘जेव्हा आम्ही भारताबाहेर खेळतो, तेव्हा तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज संघात असतो. फिरकी गोलंदाजाचा पहिल्या डावात पुरेसा उपयोग होत नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त भार पडतो. वेगवान गोलंदाजांकडून असलेल्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या आहेत.’’ असेही धोनी म्हणाला.
या सामन्यात पाच बळी घेऊन पुनरागमन करणाऱ्या झहीर खानच्या गोलंदाजीचे धोनीने कौतुकही केले.