‘‘जर गोलंदाज आधीच ‘निश्चित’ करण्यात आला होता, तर फलंदाज काय करीत होता,’’ अशी शंका दिल्ली न्यायालयाने ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांपुढे गुरुवारी उपस्थित केली. या प्रकरणात कोणी फलंदाजही गुंतला आहे का, याची शहानिशा करण्यासाठी ही शंका त्यांनी उपस्थित केली.
‘‘जर गोलंदाजाला आधीच ठरवले असेल, तर फलंदाजाने काय केले होते? गोलंदाज निश्चितपणे १३ धावा कशा देऊ शकतो आणि फलंदाज तितक्याच धावा कशा काय काढू शकतो? जर त्याने ठरलेल्या धावा दिल्या नाहीत तर काय? चव्हाण गोलंदाजी करीत असताना फलंदाज कोण होता? त्याच्यासुद्धा काही गोष्टी नियंत्रणात असू शकतात, कारण शेवटी धावा फलंदाज काढणार असतो?,’’ अशा शंका अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनय कुमार खन्ना यांनी उपस्थित केल्या. फलंदाजाच्या सहकार्याशिवाय गोलंदाज ठरलेल्या धावा कशा देऊ शकतो, याचे मला आश्चर्य वाटते, असे खन्ना यांनी सांगितले. अंकित चव्हाणच्या अंतरिम जामिनाच्या सुनावणीप्रसंगी न्यायाधीशांनी या शंका उपस्थित केल्या.
अतिरिक्त सरकारी वकील राजीव मोहन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, आम्ही अन्य खेळाडू किंवा फलंदाजाच्या भूमिकेचा तपास करीत नाही.