करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केलं आहे. यानंतरही हे लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याचे संकेत मिळालेले असून, यासाठी नवीन नियमावली घालून दिली जाणार असल्याचं कळतंय. या लॉकडाउनचा फटका देशातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्यामुळे भारतीय खेळाडू सध्याच्या काळात घरात बसून आहेत. मात्र १७ मे ला लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपल्यानंतर, केंद्र सरकारने परवानगी दिल्यास खेळाडू १८ मे पासून सरावाला सुरुवात करु शकतात असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

“भारतीय खेळाडूंना घराबाहेर पडून सराव कसा करता येईल या पर्यायावर बीसीसीआय विचार करत आहे. यासाठी १८ मे ला लॉकडाउन संदर्भात केंद्र सरकार काय नवीन नियमावली जाहीर करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लॉकडाउन काळात खेळाडूंना प्रवासाची परवानगी मिळणार नाही, याचसाठी त्यांच्या घराजवळ सरावाची काही साधनं किंवा मैदान आहे का याची आम्ही माहिती घेत आहोत. याचसोबत सरकारशीही आम्ही संपर्कात आहोत.” बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

लॉकडाउन काळानंतर खेळाडूंना पुन्हा सराव सुरु करण्यासाठी बीसीसीआयचा प्लान तयार असल्याचंही धुमाळ यांनी स्पष्ट केलं. सध्या मोहम्मद शमी आपल्या घरासमोरील मैदानात रोज संध्याकाळी धावण्याचा सराव करत असल्याचं धुमाळ यांनी सांगितलं आहे. दरम्यान, देशातली सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे. याचसाठी स्पर्धा रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.