एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आपल्या खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी बनलेल्या लोकेश राहुलला या मालिकेत संघातून डच्चू देण्यात आला असून, वन-डे संघाचा सलामीवीर रोहित शर्माला कसोटी संघात बढती देण्यात आली आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मते, रोहितसाठी ही परिस्थिती ‘करो या मरो’ ची असणार आहे. “जर रोहितने चांगली कामगिरी केली तर त्याला संघात संधी मिळेल, जर तो अपयशी ठरला तर मग त्याला कसोटी संघातलं स्थान सोडून द्यावं लागेल.” गौतम गंभीर Indian Express वृत्तपत्राच्या Idea Exchange कार्यक्रमात बोलत होता.

“मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित सर्वोत्तम खेळाडू आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका, त्याच्यासाठी करो या मरो अशीच असणार आहे. वन-डे क्रिकेटमध्ये रोहित आताच्या घडीचा सर्वात आक्रमक फलंदाज आहे. आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळत असताना मी कित्येकदा रोहित आणि एबी डिव्हीलियर्समुळे मला रात्री झोप लागायची नाही. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजांने मला एवढं चिंतेत पाडलं नव्हतं. जर या मालिकेत रोहित चांगला खेळला, तर त्याच्यासाठी आगामी काळात संधी निर्माण होतील. मात्र तो या मालिकेत अपयशी ठरला तर मग सलामीच्या जागेसाठी दुसऱ्या खेळाडूचा शोध घ्यायची गरज आहे.” गौतम गंभीर रोहित शर्माबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होता.

संघात निवड करुन राखीव खेळाडूंमध्ये बसवून ठेवण्यापेक्षा घरच्या मैदानावर रोहित शर्माला सलामीला येण्याची संधी द्यायलाच हवी. कसोटी संघात रोहितसाठी मधल्या फळीमध्ये जागा नाही, जर तुम्ही त्याची कसोटी संघात निवड करताय तर त्याला सलामीला संधी द्यायलाच हवी. रोहितनेही मिळालेल्या संधीचा लाभ घ्यायला हवा, गौतमने रोहितला कसोटी संघातील सलामीच्या जागेसाठी शुभेच्छा दिल्या. ३ ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – रोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, आफ्रिकेविरुद्ध अध्यक्षीय संघाचं नेतृत्व