मागच्यावर्षी झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा फलंदाज भारतीय संघासमोरचा मुख्य पेच होता. या क्रमांकावर फलंदाजीला कोण येणार? ही भारतीय संघासमोरची मुख्य डोकेदुखी होती. २०१९ वर्ल्डकप स्पर्धेआधी चौथ्या क्रमांकावर भारताने वेगवेगळया फलंदाजांना संधी दिली. पण कोणीही त्या जागेवर भक्कमपणे स्वत:चे स्थान निर्माण करु शकला नाही. फक्त अंबाती रायुडू या एका फलंदाजाने त्या जागेवर धावा केल्या होत्या. अंबाती रायुडूने संघासाठी धावा केल्या होत्या. वर्षभरापासून संघाची पसंती होता, त्यामुळे त्याला संघात स्थान मिळेल असे वाटले होते.

पण एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत रायुडू याच्याजागी विजय शंकर याची निवड केली. या निर्णयावरुन मोठा गदारोळ झाला. अनेकांच्या मते रायुडूला संघात स्थान मिळायला पाहिजे होते.

अलीकडेच भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती स्वीकारलेल्या सुरेश रैनाने यावर भाष्य केले आहे. “अंबाती रायुडू भारतीय संघात चौथ्या स्थानासाठी उत्तम निवड ठरला असता तसेच तो संघात असता, तर टीम इंडियाने वर्ल्डकपही जिंकला असता”, असे म्हटले आहे.

“रायुडू खूप मेहनत करत होता. वर्ष-दीडवर्षापासून तो खेळत होता. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी मला रायुडू संघात हवा होता. त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. पण तो संघात नव्हता. २०१८ सालच्या दौऱ्याचा मी आनंद घेऊ शकलो नाही. कारण रायुडू फिटनेस टेस्ट पास न करु शकल्यामुळे त्याच्याजागी माझी निवड संघात झाली होती” असे क्रिकबझशी बोलताना रैना म्हणाला.