इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या दोन सामन्यांत पुरती दाणादाण उडाली आहे. फलंदाजीत भारताचे सलामीवीर पुरते अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत भारतीय संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुल, मुरली विजय आणि शिखर धवन या तिन्ही फलंदाजांना डावाची सुरुवात करण्याची संधी दिलेली आहे. मात्र ४ डावांमध्ये एकाही फलंदाजाला आश्वासक कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये संधी मिळाल्यास मी कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येण्यासाठी तयार असल्याचं, भारताचा हिटमॅन रोहित शर्माने म्हटलं आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली दुखापतीमधून सावरला, तिसऱ्या कसोटीत सहभागी होणार

“मला आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कधीही सलामीला येण्याची संधी देण्यात आलेली नाही. मात्र संघाला गरज असल्यास मी कसोटी क्रिकेटमध्येही सलामीला येण्यासाठी तयार आहे. भारतासाठी वन-डे क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर मी सलामीचा फलंदाज बनेन अशी कधीही कल्पना केली नव्हती. पण काळानुरुप ते घडतं गेलं, त्यामुळे कसोटी क्रिकेटसाठीही सलामीला फलंदाजीसाठी येण्यास तयार आहे.” एका खासगी कार्यक्रमात रोहितने पत्रकारांशी संवाद साधला.

भारतीय वन-डे संघाचं उप-कर्णधारपद भूषविणाऱ्या रोहितचं कसोटी संघातलं स्थान अजुनही निश्चीत झालेलं नाहीये. मात्र आपण कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करु याची रोहितला खात्री आहे. “मला कसोटी क्रिकेट खेळायचं आहे, मात्र संघात निवड होणं माझ्या हातात नाही. यासाठी मला संधीची वाट पहावी लागेल. ज्यावेळी कसोटीत पुनरागमनाची संधी मिळेल त्यावेळी मी तयार आहे. यासाठीही मी सर्वतोपरीने प्रयत्नही करत आहे.” रोहितने आपली बाजू स्पष्ट केली.

सध्या भारत ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पिछाडीवर पडला आहे. मात्र भारतीय संघात कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याची ताकद असल्याचंही रोहित म्हणाला. दक्षिण आफ्रिकेतही आम्ही पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये हरलो होतो. मात्र जोहान्सबर्ग कसोटीत आम्ही चांगला खेळ करत पुनरागमन केलं होतं. त्यामुळे उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने संयमाने खेळ केल्यास ते कसोटी मालिकेत पुनरागमन करु शकतात असं रोहित म्हणाला.