दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दोषमुक्त ठरलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतचे घरी भावुक स्वागत झाले. या वेळी जर माझा दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुंडाशी संबंध असता तर मी क्रिकेटपटू नसतो, अशी प्रतिक्रिया श्रीशांतने व्यक्त केली.
‘‘जर मी दाऊदशी संबंधित असतो तर मी इथे नक्कीच नसतो. मी दुबई किंवा अन्य कोणत्या तरी ठिकाणी असतो. जर मी दाऊदसारख्या व्यक्तीला ओळखत असतो तर मी क्रिकेटपटू नसतो,’’ असे श्रीशांत म्हणाला.
आयपीएलच्या सहाव्या मोसमात स्पॉट-फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीशांतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. पण यांच्याविरोधात पोलिसांकडे सबळ पुरावा नसल्याने या तिघांनाही न्यायालयाने दोषमुक्त ठरवले आहे.
दिल्लीहून कोची विमानतळावर उतरल्यावर श्रीशांतचे त्याचे चाहते, मित्र आणि नातेवाईकांनी स्वागत केले. या वेळी सारेच जण भावुक झाले होते. केरळातील लोकांनी मला प्रत्येक वेळी पाठिंबा दिला आणि ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, असे श्रीशांत या वेळी म्हणाला.
या निर्णयामुळे पुन्हा एकदा आयुष्य आणि क्रिकेट नव्याने सुरू करण्याची संधी मिळाल्याचे श्रीशांतने सांगितले. तो म्हणाला, ‘‘आजपासूनच मी सरावाला सुरुवात करणार आहे. बीसीसीआय माझ्यावरील घालण्यात आलेली आजीवन बंदी उठवेल, अशी मला आशा आहे.’’