बॉर्डर-गावसकर मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यास दोन वर्षांपूर्वी झालेल्या मालिका पराभवापेक्षा ही गोष्ट ऑस्ट्रेलियासाठी अधिक निराशाजनक ठरेल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं व्यक्त केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत २-१ असं पराभूत केलं होतं. परंतु यंदा कोहलीसह अन्य प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताने ऑसट्रेलियाला कडवी झुंज दिली आहे, असं भारतीय संघाचं कौतुकही पाँटिंगनं केलं आहे.

”चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवसाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. कारण भारतानं ही कसोटी बरोबरीत राखल्यास ऑस्ट्रेलियाला अधिक दु:ख होईल. २०१८ मध्ये संघामध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांचा समावेश नव्हता. तसेच गोलंदाजांची कामगिरीही आता फार उंचावली आहे. या सर्व अनुकूल गोष्टींनंतरही ऑस्ट्रेलियानं मालिका गमावल्यास अथवा बरोबरीत सोडवल्यास यजमानांसाठी ती मोठी नामुष्टी ठरेल, असं रोखठोख मत रिकी पाँटिंग यानं व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- शुबमन गिलची धमाका! मोडला सुनील गावसकरांचा ५० वर्ष जुना विक्रम

यावेळी रिकी पाँटिग यानं ऑस्ट्रेलियाच्या गोंलदाज आणि कर्णधार टिम पेन याच्या नेतृत्वाचा खरपूस समाचारही घेतला. चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज १८६ धावांत तंबूत परतले होते. यावेळी तळाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आक्रमक गोलंदाजी आणि नेतृत्वाची कमी भासली. तळाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी उसळत्या चेंडूचा मारा करण्याची आवशकता होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा कमी केला. त्यामुळेच शार्दुल ठाकूर आणि वॉशिंगटन सुंदर यांनी सहजासहजी धावा केल्या , असं पाँटिंग म्हणाला.

आणखी वाचा- IND vs AUS : ऋषभ पंतनं मोडला धोनीचा विक्रम

दरम्यान, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानं तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघान अनिर्णित राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. गाबाच्या मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचं आव्हान एकदाही कोणत्याही संघाला पार करता आलं नाही. शिवाय, मागील १०० वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाही पराभव झाला नाही. त्यामुळे ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावरील हा रेकॉर्ड भारतीय संघ मोडणार का? याकडे क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे.