करोनानंतर पाकिस्तानचा परदेश दौरा बुधवारपासून सुरू झाला. इंग्लंड-पाकिस्तान पहिल्या कसोटीला ५ ऑगस्टपासून झाली. पहिल्या दिवसाच्या खेळात पावसाने व्यत्यत आणल्याने फारसा खेळ होऊ शकला नाही. पण पाकिस्तानने केलेल्या २ बाद १३९ या धावसंख्येत फलंदाज बाबर आझमने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने १०० चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. पण त्याच्या या खेळीचे म्हणावे तसे कौतुक झाले नाही, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने व्यक्त केले.

“(बाबरच्या खेळीचं कौतुक न होणं) ही शरमेची बाब आहे. पाकिस्तानचा संघ सातत्याने युएईमध्ये आपल्या मालिका आयोजित करतो. घरच्या मैदानावर आपल्या चाहत्यांसमोर त्यांना खेळण्याची संधी मिळत नाही. त्याचा हा दुष्परिणाम आहे. भारतीय क्रिकेटमुळे पाकिस्तानचं क्रिकेट झाकून जातं. कारण आज जी खेळी बाबर आझमने केली, तीच खेळी विराट कोहलीने केली असती, तर चाहत्यांनी त्याचा जयजयकार केला असता”, असे समालोचन कक्षातून (कॉमेंट्री बॉक्स) बोलताना नासीर हुसेन म्हणाला.

“२०१८ पासून बाबर आझमची धावा करण्याची सरासरी कसोटी क्रिकेटमध्ये ६८ तर वन डे, टी-२० मध्ये ५५ आहे. तो नवखा, तरूण आणि तडफदार फलंदाज आहे. त्याच्यात फलंदाजीतील बरेच चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे. सध्याच्या घडीला चार फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहेत. पण लवकरच ती संख्या ५ होणार असून त्या टॉप ५ मध्ये बाबर आझमचा समावेश असेल”, असा विश्वास त्याने व्यक्त केली.

दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू लॉकडाउननंतर आतापर्यंत कोणत्याही आंतरराष्टीय क्रिकेट मालिकेत खेळलेले नाहीत. आता थेट IPL 2020 साठीच भारतीय संघाचे खेळाडू मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे.