२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजीची दाणादाण उडाली होती. महेंद्रसिंह धोनी या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही, धोनीने उपांत्य सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणं गरजेचं होतं, असं मत व्यक्त केलं आहे.

“महेंद्रसिंह धोनी उपांत्य सामन्यात फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर आला असता तर उपांत्य सामन्याचं चित्र नक्कीच वेगळं दिसू शकलं असतं. ज्यावेळी भारतीय डावाला स्थैर्य देण्याची गरज असताना धोनीने वरच्या क्रमांकावर येणं अपेक्षित होतं. याचसोबत हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता तरीही भारताने आवश्यक धावा सहज पूर्ण केल्या असता.” एका खासगी कार्यक्रमात सेहवाग पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – भारतीय संघ कोणाचीही खासगी मालमत्ता नाही, धोनीच्या निवृत्तीबद्दल भारतीय क्रिकेटपटूचे खडे बोल

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताची आघाडीची फळी झटपट माघारी परतली. मधल्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्यांना यश आलंच नाही.

अवश्य वाचा – अनिल कुंबळेला निवड समितीचा अध्यक्ष बनवा – विरेंद्र सेहवाग