२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. संपूर्ण स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीचा हरवलेला फॉर्म आणि त्याची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय होता. यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. पंतला आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आलेला नाही. गेलं वर्षभर महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. गेले अनेक दिवस धोनीच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. मात्र भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या मते धोनीने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळलीच पाहिजे.

“मला माही भाईची खूप आठवण येते. ज्यावेळी तुम्ही संघात सिनीअर खेळाडूंसोबत खेळता, तेव्हा त्यांच्या असण्याची तुम्हाला सवय होते आणि ते संघात नसले की त्यांची कमी तुम्हाला भासायला लागते. निवृत्ती घ्यायची की नाही हा पूर्णपणे धोनीचा निर्णय आहे आणि तो त्यालाच घेऊन दिला पाहिजे. तो अजुनही शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे. माझ्यामते त्याने आगामी टी-२० विश्वचषकात खेळायला हवं. मला ते नक्कीच आवडेल, आम्हा सर्वांसाठी ते अधिक सोयीचं होईल.” कुलदीप Sportskeeda च्या Instagram Live Chat मध्ये बोलत होता.

आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानात पदार्पण करणार होता. मात्र करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने ही स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे धोनीचं क्रिकेटच्या मैदानातलं पुनरागमन लांबलं आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे, यासाठी स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाच्या अखेरीस खेळवता येईल का याची चाचपणी करत आहे.