विराटसेना पूर्ण क्षमतेने खेळली तर भारत तिसऱ्यांदा विश्वचषक विजेता होईल असा विश्वास गुरू रवी शास्त्री यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्याशिवाय धोनीच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा होईल असेही ते म्हणाले. ३० मे रोजी इंग्लंड आणि वेल्समध्ये १२ व्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघ इंग्लसाठी रवाना झाला. प्रयाण करण्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री बोलत होते. या वेळी कर्णधार विराट कोहलीही उपस्थित होता.

यावेळी बोलताना रवी शास्त्री यांनी भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावेल असा विश्वास व्यक्त केला. पण त्यासठी भारतीय संघाला आपल्या पूर्ण क्षमतेनं उतरावे लागेल असे ते म्हणाले. विश्वचषकातील दोन सामन्यांमध्ये विश्रांतीसाठी पुरेसा वेळ आहे. त्यामुळे खेळाडूंना थकवा जाणवेल असे वाटत नाही. भारताच्या खेळाडूंना या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. जर आम्ही पूर्ण क्षमतेने खेळलो तर विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरण्यात यशस्वी ठरू. यंदाची स्पर्धाही आव्हानात्मक आहे. २०१५ च्या तुलनेत बांगलादेश आणि विंडीज हे संघ आधिक दर्जेदार झाले आहेत. विश्वकप सारख्या मोठ्या स्पर्धेचा आनंद घ्यायला हवा. यंदा भारतीय संघातील धोनीची भूमिका महत्वाची असणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनी अत्यंत अनुभवी आहे. महत्वाच्या सामन्यांना कलाटणी देण्याचे काम अनेकदा त्याने केले आहे, असेही शास्त्री म्हणाले.

महेंद्रसिंग धोनी याची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भूमिका मोलाची असेल. संघातील इतर खेळाडूंशी तो सहज संवाद साधतो. यष्टीरक्षक म्हणून इतके वर्षाचा अनुभव धोनीच्या गाठीशी आहे. एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये धोनीपेक्षा उत्तम यष्टीरक्षक कोणीही नाही, हे धोनीने दरवेळी सिद्ध केले आहे. केवळ झेल पकडणे याच विभागात नसून धावचीत करणे किंवा स्टंपिंग करणे या विभागातही तो उत्तम आहे”, असे रवी शास्त्री म्हणाले.

याच पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला की , World Cup २०१९ हा सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक विश्वचषक असेल. कारण आतापर्यंत मी जे एकदिवसीय विश्वचषक खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून खेळतोय. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. आमचा संघ हा अत्यंत समतोल आहे. त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे हेच यंदाच्या विश्वचषकातील आमचे उद्देश्य आहे.