भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या सुरूवातीला फलंदाजी डगमगली असली तरी तळाच्या दोन फलंदाजांनी दमदार खेळ करत यजमानांना केवळ ३३ धावांचीच आघाडी मिळू दिली. शुबमन गिल (७), रोहित शर्मा (४४), चेतेश्वर पुजारा (२५), अजिंक्य रहाणे (३७), मयंक अग्रवाल (३८) आणि ऋषभ पंत (२३) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी १२३ धावांची भागीदारी रचली. या दमदार संघर्षानंतर आता टीम इंडिया हा सामना कसा जिंकू शकेल? याचा कानमंत्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दिला.

“ऑस्ट्रेलियाने सध्या ३३ धावांची आघाडी घेतली आहे. जर हा खेळ पाचव्या दिवसापर्यंत रंगला तर खेळपट्टीचा अंदाज देणं शक्य नाही. कारण दिवसागणिक खेळपट्टीचा स्वभाव बदलत असतो. अशा परिस्थितीत चौथ्या डावात भारताची फलंदाजी असणं खूपच त्रासदायक असेल. तशातच पाचव्या दिवसाच्या खेळाचं दडपणदेखील नक्कीच असेल. त्यामुळे आता सामना जिंकण्याचा उपाय एकच आहे. भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवशी गोलंदाजी करताना जास्त धावा खर्च करू नयेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चौकार-षटकार मारण्याची संधी दिली जाऊ नये. जर यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले तर भारताचा पराभव टळेल. पण सामना जिंकायचा असेल तर ऑस्ट्रेलियाला २०० धावांच्या आतच रोखावं लागेल”, असे गावसकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.

दरम्यान, त्याआधी ऑस्ट्रेलियाचाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१) व मार्कस हॅरिस (५) स्वस्तात माघारी परतले. स्मिथदेखील ३६ धावांवर बाद झाला. मॅथ्यू वेड आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारी झाली. वेड ४५ धावांवर बाद झाला, तर मार्नस लाबूशेनने ९ चौकारांसह १०८ धावा केल्या. कर्णधार टीम पेनने अर्धशतक झळकावलं, पण कॅमेरॉन ग्रीन अर्धशतकानजीक (४७) असताना बाद झाला. त्यानंतर मिचेल स्टार्क (२०) आणि नॅथन लायन (२४) जोडीने थोडीशी झुंज दिली. पण त्यांचा डाव ३६९ धावांवर आटोपला.