एकीकडे रवी शास्त्री हे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान व्हावे अशी विराट कोहलीची इच्छा आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा बीसीसीआयचे खजिनदार अनिरूद्ध चोधरी यांची पहिली पसंती आहे. त्याचबरोबर हेही स्पष्ट झाले आहे की, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विदेशी नव्हे तर भारतीय प्रशिक्षकाचीच निवड होणार आहे. सेहवाग आपल्या कारकीर्दीतील अखेरच्या टप्प्यात २०१५ मध्ये रणजी ट्रॉफी हरियाणाकडून खेळला होता. यामागे अनिरूद्ध चौधरी या निर्णयामागे अनिरूद्ध चौधरीच असल्याचे बोलले जाते. फलंदाजीबरोबर मैदानाबाहेर बोलंदाजी म्हणजेच शाब्दिक फटके लगावणाऱ्या सेहवागला तो प्रशिक्षकपदी निवडला गेल्यास त्याला तोंड बंद ठेवण्यास सांगितले जाऊ शकते.

डेक्कन क्रॉनिकलबरोबर बोलताना बीसीसीआयशी निगडीत एका सूत्राने सांगितले की, प्रशिक्षकपदासाठी कोणी एक प्रबळ दावेदार नाही. परंतु, अर्जासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. जर सेहवाग टीमच्या प्रशिक्षकपदी निवडला गेला तर त्याला आपले तोंड बंद ठेवण्यास सांगितले जाऊ शकते. कारण सोशल मीडियावर सेहवाग सक्रिय आहे. आपल्या फलंदाजीप्रमाणे तो ट्विटरवरही शाब्दिक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रशिक्षक असताना त्याच्या या फटकळपणामुळे अडचणी येऊ नयेत, म्हणून त्याला तोंड बंद ठेवण्यास सांगितले जाऊ शकते.

श्रीलंका दौऱ्याआधी नवा प्रशिक्षक निवडला जाईल, अशी शाश्वती बीसीसीआयने यापूर्वीच दिली आहे. भारतीय टीम २४ जुलैपासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. आता टीम वेस्ट इंडिजमध्ये ५ वन डे आणि १ टी २० सामना खेळण्यासाठी गेली आहे.

वीरेंद्र सेहवागने २५१ वन डे सामन्यात १५ शतके आणि ३८ अर्धशतकांच्या मदतीने ८२७३ धावा बनवल्या आहेत. यादरम्यान त्याने २१९ धावांची खेळी देखील केली होती. कसोटीत त्यांनी १०४ सामन्यात दोन त्रिशतके ठोकत ८५८६ धावा कुटल्या. वन डेत त्याचा स्ट्राइक रेट हा १०४.३३ तर कसोटी ८२.३३ असा राहिला आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि कनिष्ठ राष्ट्रीय संघाचा मुख्य निवडकर्ता व्यंकटेश प्रसादनेही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर व्यंकटेश प्रसाद आणि टीम इंडियाचे माजी डायरेक्टर रवी शास्त्री हे दोन नवीन अर्जदार आहेत. या पदासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी, इंग्लंडचे रिचर्ड पायबस, भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश आणि देशांतर्गत क्रिकेट खेळलेले लालचंद राजपूत यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे.