भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदच्या विश्वविजेतेपदावर आता भारतातील अव्वल बुद्धिबळपटूंची कारकीर्द टांगणीला लागली आहे. आनंदला विजेतेपद राखण्यात यश मिळाले नाही, तर केवळ आनंदच नव्हे तर भारतामधील अनेक खेळाडूंवर पुरस्कर्ते गमावण्याची वेळ येईल.
भारतामधील प्रायोजकांमध्ये आनंद हा बुद्धिबळातील ब्रॅण्ड अॅम्बेसेडर मानला जातो. आनंदने आतापर्यंत तब्बल पाच वेळा विश्वविजेतेपदाची कमाई केल्यामुळे भारतातील अनेक बुद्धिबळपटूंकडे पुरस्कर्त्यांचा ओढा वाढला. याविषयी ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण म्हणाला, ‘‘जर आनंदने ही लढत जिंकली, तर भारतातील अन्य बुद्धिबळपटूंचाही ‘भाव’ वाढेल. ही लढत भारतामधील बुद्धिबळासाठी कलाटणी देणारी ठरणार आहे.’’
‘‘आनंदने विश्वविजेतेपद गमावले, तर भारतीय बुद्धिबळपटूंसाठी तो मोठा धक्का असेल. आनंद हा आमच्यासाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. त्याच्यामुळेच भारतातील बुद्धिबळपटूंना भरपूर प्रसिद्धी मिळत आहे,’’ असे ब्रॅण्ड कॉम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामानुजम श्रीधर यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकणाऱ्या एका ग्रँडमास्टरने श्रीधर यांच्या मताशी सहमत दर्शवली. ‘‘आनंदने ही स्पर्धा गमावली, तर आम्हा भारतीय खेळाडूंसाठी ती मोठी हानी असेल. आम्हाला अनेक प्रायोजकांपासून वंचित राहावे लागेल,’’ असे त्याने सांगितले.
कार्लसनने घेतलेली दोन गुणांची आघाडी भरून काढणे आनंदसाठी कठीण झालेले आहे. उर्वरित चार डावांमध्ये त्याला तीन डाव जिंकावे लागतील. मात्र ही पिछाडी आनंद भरून काढू शकणार नाही, असे बुद्धिबळपंडितांचे म्हणणे आहे.