वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट कायम आहे. चौथा दिवसही पावसामुळे वाया गेला आहे. चार दिवसात फक्त १४१ षटकं टाकली आहेत. तर भारताचा एक डाव पूर्ण झाला असून न्यूझीलंडचा संघ मैदानात खेळत आहे. त्यामुळे सामना ड्रा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला मोलाचा सल्ला दिला आहे. संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी त्यांनी आयसीसीला सूचना केली आहे.

“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ड्रा होईल असं दिसतंय. त्यामुळे संयुक्त विजेता घोषित केला जाईल. पहिल्यांदाच अंतिम सामन्यात ट्रॉफी शेअर केली जाणार आहे. फुटबॉलमध्ये विजेता घोषित करण्यासाठी पेनल्टी शूटआउट असतं. टेनिसमध्येही पाच सेट असतात आणि एक टाय ब्रेकर सेट असतो. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये तसं काही नाही. त्यामुळे तसं न करता तीन चार दिवसांनी अंतिम सामना खेळवण्यास हरकत नाही. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत.”, असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी दिला आहे. “विजेता संघ निवडीचा पण एक फॉर्म्युला असला पाहीजे. यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने विचार केला पाहीजे आणि निर्णय घेतला पाहीजे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

कडकच..! एक विकेट घेत दोन विक्रम नावावर करणारा गोलंदाज म्हणजे इशांत शर्मा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला आहे. चौथ्या दिवशी एकही चेंडू खेळवला गेला नाही. तब्बल पाच तास खेळ सुरू होण्याची वाट पाहण्यात आली, पण पावसाने चाहत्यांना निराश केले आहे. रविवारी तिसऱ्या दिवशी काईल जेमीसनच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, तर न्यूझीलंडच्या फलंदाजीपुढे गोलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या माऱ्यापुढे भारताचा पहिला डाव २१७ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २ बाद १०१ अशी मजल मारत सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेच्या (१५३ चेंडूंत १२ चौकारांसह ५४ धावा) अर्धशतकाचा यात समावेश आहे.