आशिया चषकाचा विजयी कर्णधार रोहित शर्माला आत्मविश्वास

विविध स्पर्धामध्ये कर्णधारपदाची संधी मिळालेल्या रोहित शर्माने प्रत्येक वेळी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. त्याप्रमाणेच भविष्यात कधीही भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी विचारणा करण्यात आली, तर मी त्यासाठी नक्कीच तयार असेन, अशी प्रतिक्रिया भारताला सातव्यांदा आशिया चषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रोहितने शनिवारी व्यक्त केली.

रोहितच्या नेतृत्वाखालील भारताने अंतिम फेरीत बांगलादेशला तीन विकेट्स राखून पराभूत करत आशिया चषकावर नाव कोरले. मार्च महिन्यात श्रीलंकेमध्ये झालेल्या निधास करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपदही भारताने रोहितच्याच कर्णधारपदाखाली मिळवले होते. इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून रोहितची गणना होते. त्याने मुंबई इंडियन्स संघाला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे.

भविष्यात प्रदीर्घ काळासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर तू तयार आहेस का, या प्रश्नावर रोहित म्हणाला, ‘‘नक्कीच. आम्ही नुकतीच एक स्पर्धा जिंकली आहे, त्यामुळे मी कर्णधारपदासाठी १०० टक्के तयार आहे. त्याशिवाय भविष्यात जेव्हाही कधी मला कर्णधारपदासाठी विचारणा करण्यात येईल त्यावेळीही माझे उत्तर हेच असेल.’’

‘‘कर्णधारपद सांभाळणे म्हणजे काटेरी मुकुट परिधान करण्यासारखे आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू जेव्हा विश्रांती घेतात तेव्हा अनेक आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागतो. प्रत्येक संघाला याची जाणीव असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत नव्या खेळाडूंनी या संधीचा फायदा उचलायला हवा. कर्णधार म्हणून मी स्वत:सुद्धा त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण व स्वातंत्र्य निर्माण करणे आवश्यक आहे,’’ असे रोहित पुढे म्हणाला.

भारतीय संघ अद्यापही चौथ्या व सहाव्या क्रमांकावर योग्य फलंदाज शोधत आहे, असे रोहितने नमूद केले. ‘‘चौथ्या व सहाव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार यासाठी आम्हाला आणखी काही सामने वाट पहावी लागणार आहे. सध्या तरी त्या क्रमांकावर कोण योग्य आहे, हे मी सांगू शकत नाही. मात्र विश्वचषकापर्यंत चित्र स्पष्ट होईल, अशी आशा आहे,’’ असे रोहितने सांगितले. याशिवाय अंबाती रायुडू, केदार जाधव व दिनेश कार्तिक यांनी मालिकेत मोक्याच्या वेळी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचेही त्याने कौतुक केले.

धोनी आणि माझ्यात एक साम्य!

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून आशिया चषकात चमकदार कामगिरी झाली नसली तरी रोहितला मात्र त्याचा एका वेगळ्या गोष्टीसाठी अभिमान वाटतो. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दडपणाखाली शांतचित्ताने खेळ करण्याची रोहितची क्षमता वाखणण्याजोगी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्याविषयी रोहित म्हणाला, ‘‘माझ्या कारकीर्दीत मी अजूनपर्यंत एकदाही धोनीला चिंतित पाहिलेले नाही. तो त्याचे निर्णय योग्य वेळेत विचार करून घेतो. किंबहुना त्याच्यातीलच काही गुण माझ्यातही आहेत, असे मला वाटते.’’

‘‘मीसुद्धा प्रथम विचार करतो व नंतरच प्रतिक्रिया देतो. धोनीला पाहताच मी हे शिकलो आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विचार करून अचूक निर्णय घेण्याची क्षमता फार कमी कर्णधारांना अवगत आहे. धोनीसह इतके क्रिकेट खेळल्यामुळेच त्याचे काहीसे गुण माझ्यात आले आहेत,’’ असे रोहितने मजेशीरपणे सांगितले.