विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. टी-२० मालिका ५-० ने जिंकणाऱ्या भारतीय संघाला वन-डे आणि कसोटी मालिकेतही व्हाईटवॉश स्विकारावा लागला. भारतीय फलंदाजांचं अपयश हे संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण मानलं जातंय. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे फलंदाज या मालिकेत पुरते अपयशी ठरले. भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी प्रमुख संदीप पाटील यांनी अजिंक्यच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे.

“आपण अपयशी होऊन ही भीती ज्यावेळी फलंदाजाच्या मनात असते त्यावेळी तो संथ गतीने खेळतो. अजिंक्य मुंबईकडून खेळत असतानाही मी त्याच्याबद्दल ऐकलं आहे. तुमच्या मनात भीती असली की असं होतं. त्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. परदेशात त्याची कामगिरी चांगली आहे, पण या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. सध्या अजिंक्यला टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून ओळखलं जातं. टी-२० – वन डे संघातलं स्थान त्याने गमावलंय. असा खेळ करुन तो त्याच्या टीकाकारांचं म्हणणं खरं करतोय. तुला जर क्रीजवर फक्त उभं रहायचं असेल तर वॉचमनला बोलावं. धावा करायच्या कोणी??” संदीप पाटील टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अजिंक्यने मैदानात येताक्षणीच फटकेबाजीला सुरुवात करावी असं माझं म्हणणं नाही. सध्या अजिंक्य ज्या पद्धतीने खेळतोय ते त्याच्यासाठी योग्य नाही. माझ्यासारखा एक सामन्य खेळाडू जर परदेशात टिकू शकतो तर हे सर्व खेळाडू चॅम्पिअन आहेत. जर अजिंक्यला ही गोष्ट समजत नसेल तर रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक काय करतायत?? एका फलंदाजाची कामगिरी खराब झाली तर त्याच्या पाठीमागून येणाऱ्या फलंदाजांचीही कामगिरी खराब होते, संदीप पाटील यांनी अजिंक्यच्या खराब कामगिरीबद्दल आपलं मत मांडलं.