करोनाविरुद्धची लढत जिंकायची असेल, तर घरीच थांबा. ही तुमची देशासाठीची लढाई आहे, असे आवाहन कसोटी क्रिकेटमध्ये मैदानावर दीर्घकाळ फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील अग्रगण्य खेळाडूंशी चर्चा करून करोनाविरुद्ध लढय़ाची पंचसूत्रे त्यांना सांगितली. याबाबत राजकोट येथील निवासस्थानी असलेल्या पुजाराने म्हटले की, ‘‘खेळाडूंमध्ये असलेली झुंजार वृत्ती सर्वसामान्य नागरिकांमध्येही आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी आमच्याकडे केले. नागरिक सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत आहेत. परंतु काही जण या विषाणूबाबत गांभीर्य पाळताना दिसत नाहीत. त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, हेच त्यांना कळत नाही.’’

‘‘आता प्रत्येक व्यक्ती सैनिक आहे. तुम्ही घरी थांबाल, तरच तुम्ही देशासाठी लढत आहात, असा अर्थ निघेल. संघटित प्रयत्न झाले नाही, तर ही लढाई जिंकता येणार नाही,’’ असे पुजाराने सांगितले.