भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये डेन्मार्कच्या मथीयास बोई याला कोणीही बोली न लावल्यामुळे त्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत आगामी थॉमस स्पर्धेनंतर भारतात पुन्हा येणार नसल्याचे सांगितले. मथीयास याची ५० हजार डॉलर्स ही किमान किंमत ठरविण्यात आली होती.
बोई याने २०११ मध्ये ऑल इंग्लंड सुपरसीरिज जिंकली होती. त्यामुळे ३३ वर्षीय खेळाडूला चांगली बोली मिळेल अशी अपेक्षा होती. त्याचा सहकारी कर्स्टन मोगेन्सन याला मात्र ५० हजार डॉलर्सच्या बोलीवर बंगळुरु संघाने खरेदी केले आहे. त्यामुळेच बोई जास्त नाराज झाला आहे.
तो म्हणाला, या स्पर्धेचा प्रसार मी केला होता. या स्पर्धेकरिता मी आमच्या देशातील राष्ट्रीय स्पर्धेवर पाणी सोडण्याचा निर्णयही घेतला होता. पुढील वर्षी थॉमस चषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामध्ये भाग घेतल्यानंतर पुन्हा भारतात मी पाऊल ठेवणार नाही.
बोईप्रमाणेच जागतिक क्रमवारीतील चौथा मानांकित बुनसाक पोन्साना (थायलंड), पाचवा मानांकित केनिची तागो (जपान), आठवा मानांकित टॉमी सुगिआतरे व सोनी दुईकुंकारा (इंडोनेशिया) यांनाही कोणी वाली भेटला नाही. ही स्पर्धा १४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 24, 2013 5:28 am