ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता सर्वांचे लक्ष एकदिवसीय मालिकेकडे लागले आहे. त्यातही एकदिवसीय मालिकांमध्ये महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. म्हणूनच धोनीचे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र दुसरीकडे कसोटी मालिकेमध्ये चांगलाच चर्चेत राहिलेल्या टीम पेनने आपल्याला धोनीविरुद्ध खेळावे लागणार नाही याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. टीम पेनची ऑस्ट्रेलियन बोर्डाने एकदिवसीय मालिकेसाठी निवड केलेली नसल्याने तो या मालिकेत खेळणार नाही. असे असले तरी धोनीसारख्या ग्रेट खेळाडूविरुद्ध मैदानात उतरावे लागणार नाही, याचं समाधान असल्याचे तो म्हणाला आहे.

उद्यापासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी पेन धोनीबद्दल भरभरून बोलला आहे. मला धोनीला खेळताना पाहायला आवडते. तो ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतो ते पाहताना मज्जा येते असं सांगतानाच मला धोनीच्या विरुद्ध मैदानात उतरावे लागणार नाही याचाही आनंद असल्याचे पेन म्हणतो. सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्यांपैकी धोनी हा अव्वल तीनमध्ये असल्याचे मत पेनने व्यक्त केले. ‘एकदिवसीय क्रिकेट खेळणारा धोनी हा सर्वोत्तम यष्टीरक्षक- फलंदाज आहे. त्याला मैदानात पाहणे आनंद देणारे असते. पण मला अपेक्षा आहे की या मालिकेत तो आमच्या संघाविरुद्ध जास्त धावा करणार नाही. तरी त्याच्याविरुद्ध मला मैदानात उतरावे लागणार नाही ही चांगली गोष्ट आहे,’ असं पेनने सांगितलं.

धोनी मैदानात अगदी शांतपणे वावरतो. तो फलंदाजी करत असो किंवा यष्ट्यांमागे असो किंवा संघाचे नेतृत्व त्याच्या हाती असो. तो सर्वकाही अगदी शांतपणे हाताळतो. खरं तर क्रिकेट हा खूप क्लिष्ट खेळ आहे. असं असतानाही तो ज्या पद्धतीने मैदानातील गोष्टी शांतपणे हाताळतो ते एक खेळाडू आणि चाहता म्हणून पाहणे खरच आनंददायी असते असे पेन म्हणतो. धोनी मैदानामध्ये सर्व गोष्टी अगदी साधेपणे करतो. तो खूप शांत असल्याने त्याला हे सर्व जमते. त्याच्या वयाचा विचार करता आणि त्याच्यावर असणारे अपेक्षांचे ओझे पाहता खरचं तो आणखीनच ग्रेट वाटतो. पण या सर्वांपेक्षा अधिक त्याला क्रिकेट खेळायला सर्वात जास्त आवडते आणि तेच महत्वाचे आहे असं पेनला वाटतं.