विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ यजमान इंग्लंडकडून पराभूत झाला. ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासोबत सामना खेळणार आहे. मात्र या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडाने विराट कोहली अप्रगल्भ खेळाडू असल्याची टीका केली आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रबाडाने ही टीका केली आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यातील एका प्रसंगाचा दाखला देत, विराटला डिवचलं आहे. गोलंदाजीदरम्यान विराटने रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत त्याला आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे खुन्नस दिली. मात्र त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर रबाडाने विराटला चकवलं, मात्र हे विराटला आवडलं नाही. या प्रसंगावरुन दोघांमध्ये थोडंसं शाब्दीक युद्धही रंगलं. विराटच्या याच वागण्याला रबाडाने अप्रगल्भपणा म्हटलं आहे.

अवश्य वाचा – सरावातून वेळ काढत टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो

“ज्यावेळी विराटने मला चौकार लगावला, तेव्हा तो माझ्याकडे पाहून पुटपुटला. मात्र नंतर मी त्याला चकवलं हे त्याला आवडलं नाही, या वागण्याचा अर्थच मला समजलं नाही. माझ्यासाठी त्याचं हे वागणं अत्यंत अप्रगल्भ होतं.” रबाडाने कोहलीवर टिका केली. स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारताने एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणाऱ्या सामन्यात जलदगती गोलंदाजांचा सामना करण्याचं मोठं आव्हान भारतासमोर असणार आहे. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.