मुंबई : देशातील युवा बुद्धिबळपटूंमध्ये अफाट गुणवत्ता व आश्चर्यचकित करणारी क्षमता असून त्यांना प्रशिक्षण व स्पर्धासाठी योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, अशी इच्छा भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सोमवारी व्यक्त केली.

‘‘भारताच्या किशोर, कुमार व युवा वयोगटातील खेळाडूंत फार कौशल्य आहे. मला ठरावीक असे सांगता येणार नाही, मात्र ८ ते २० या वयोगटातील खेळाडू दिवसेंदिवस बुद्धिबळाकडे वळत आहेत. किंबहुना भारताचा युवा संघ हा सध्या जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे,’’ असे ४९ वर्षीय आनंदने सांगितले.

‘‘प्रत्येक वयोगटात राष्ट्रीय विजेता बनणे कठीण आहे. काही आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे भवितव्य अधांतरी आहे. भारतात मात्र ‘आयआयएफएल’सारख्या अनेक स्पर्धाचे आयोजन केले जाते. त्याशिवाय १३ वर्षांखालील मुलांनाही येथे खेळण्याची संधी मिळते. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात गुणी खेळाडूंची खाण आहे. फक्त आता त्यांना त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी योग्य ते मंच उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे,’’ असेही आनंदने सांगितले.