करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे पुढील वर्षीही आयोजन करणे अशक्य असेल, असा दावा ऑलिम्पिक संयोजन समितीचे प्रवक्ते मासा ताकाया यांनी केला आहे.

गुरुवारी टोक्यो शहरात २२४ करोना रुग्णांची वाढ झाली. करोनाच्या फैलावाला सुरुवात झाल्यापासून प्रथमच टोक्योमध्ये एका दिवसात इतके रुग्ण आढळले. यापूर्वी एप्रिलमध्ये एकाच दिवशी २०४ जणांना करोनाची लागण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘जपान न्यूज नेटवर्क’ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार तब्बल ७७ टक्के नागरिकांनी पुढील वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन शक्य आहे का, या प्रश्नाला नकारार्थी उत्तर दिले. पुढील वर्षी २३ जुलै रोजी ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे.

‘‘ऑलिम्पिकला अद्यापही एक वर्षांचा अवधी शिल्लक आहे. परंतु टोक्यो शहरातील करोनाचे वाढते प्रमाण पाहता पुढील वर्षीही ऑलिम्पिकचे आयोजन करणे कठीण दिसत आहे. शहरातील एकंदर परिस्थितीविषयी स्थानिक आयोजन समिती सातत्याने शासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असून आता दोन आठवडय़ांनी मिळणाऱ्या पुढील आढाव्याकडे आमचे लक्ष लागले आहे,’’ असे ताकाया म्हणाले.