इम्रान खान यांनी पाकिस्तान पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, भारत-पाक क्रिकेट मालिका पुन्हा एकदा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी एहसान मणी यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान इम्रान खान दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका पुन्हा सुरु करण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य नवनिर्वाचीत अध्यक्ष मणी यांनी केलं आहे. ते इंडियन एक्सप्रेसशी बोलत होते.

“भारत-पाक क्रिकेट मालिकेबद्दल बोलणं सध्याच्या घडीला धाडसाचं ठरेल. पण आशियाई क्रिकेटला मजबूत करणं हे माझं ध्येय आहे. मी सध्या जास्त तपशीलात जाणार नाही, मात्र भारत-पाक क्रिकेट सामने हा मुद्दा आशियाई क्रिकेटच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. यासाठी दोन्ही क्रिकेट बोर्डांना एकत्र बसून तोडगा काढावा लागणार आहे. सुदैवाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यासाठी सकारात्मक आहेत.” मणी यांनी भारत-पाक क्रिकेट मालिकेवर आपलं मत मांडलं. दरम्यान पाक क्रिकेट बोर्डाचे मावळते अध्यक्ष नजीम सेठी यांनी आपला राजीनामा दिला आहे.

२०१२-१३ सालापासून भारत व पाकिस्तान यांच्यात एकही क्रिकेट सामना खेळवला गेलेला नाहीये. सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी कारवायांमुळे भारतीय सरकारने दोन्ही देशांच्या मालिकेला परवानगी नाकारली आहे. याचसोबत आशियाई चषकाचं यजमानपद पाकिस्तानला मिळाल्यानंतर बीसीसीआयने स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिल्यानंतर, स्पर्धेचं यजमानपद युएईला देण्यात आलं होतं. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.