महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज इम्रान ताहिरने ‘द हंड्रेड’ लीगमध्ये धुमाकूळ घातला आहे. लीगमधील सर्वात वयस्कर असलेल्या ताहिरने वयाच्या ४२व्या वर्षी लीगच्या पहिल्या हॅट्ट्रिकसह ५ विकेट्स घेत आपला फिटनेस सिद्ध केला आहे. बर्मिंगहॅम फिनिक्सकडून खेळताना ताहिरने वेल्श फायरविरुद्ध २५ धावा देऊन ५ बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना बर्मिंगहॅम फिनिक्सने युवा फलंदाज विल समीदच्या ३८ चेंडूत ६५ धावांच्या तुफानी खेळीच्या आधारे १०० चेंडूत १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेल्श फायर ९१ धावांवर सर्वबाद झाला. इम्रान ताहिरने ग्लेन फिलिप्स, डू लुई, कैस अहमद, मॅट मिलनेस आणि डेव्हिड पायने यांना माघारी धाडले.

 

 

हेही वाचा – अफगाणिस्तानला मिळाला नवा बॉलिंग कोच, एकेकाळी जीवघेण्या वेगानं टाकायचा चेंडू!

या सामन्यापूर्वी ताहिर आपला जुना फॉर्म परत मिळवण्यासाठी धडपडत होता. या सामन्यापूर्वी, त्याला या लीगमध्ये ५ सामन्यात फक्त १ बळी मिळवता आले. पण वेल्श फायरविरुद्ध तो त्याच्या जुन्या लयीत दिसला. तो सामनावीर ठरला. या सामन्यानंतर बर्मिंगहॅम फिनिक्स संघाचे ६ सामन्यात ८ गुण झाले आहेत. आता ते गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहेत. दुसऱ्या स्थानावर ट्रेंट रॉकेट्स आहेत. त्यांचेही ६ सामन्यात ८ गुण झाले आहेत. मात्र त्यांचा नेट रनरेट बर्मिंगहॅम फिनिक्सपेक्षा कमी आहे.