भारत-इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात भारतीय वंशाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या दमदार फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करण्याचे भारतीय वंशाच्या गुरिंदर संधू या २१ वर्षीय युवा खेळाडूचे स्वप्न साकार होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय संघात पहिल्यांदाच एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
मूळचा पंजाबाच्या फरिदकोटचा गुरिंदर ऑस्ट्रेलियाच्या ‘न्यू साऊथ वेल्स’ संघाकडून खेळतो. ‘बिग बॅश लीग’मध्ये गुरिंदरने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
याआधीही ऑस्ट्रेलिया दौऱयावर आलेल्या भारतीय संघाविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी गुरिंदरला मिळाली होती परंतु, फिल ह्युजेसच्या मृत्यूमुळे शोककळा पसरल्याने सराव सामना रद्द करण्यात आला होता. मात्र, यावेळी संघात स्थान मिळविण्यात यशस्वी झालेल्या गुरिंदरचे स्वप्न या तिरंगी मालिकेतून पूर्ण होणार आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेशी’ बोलताना गुरिंदर म्हणाला की, “भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीतून त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. अशा निष्णात फलंदाजांना बाद करता येणे हे माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण करणाऱया प्रत्येक गोलंदाजाचे लक्ष्य असते. आणि अशा तडफदार फलंदाजावर दबाव निर्माण करता येणे हीच यशस्वी गोलंदाज होण्याची गुरूकिल्ली आहे.”   
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. मिचेल तिरंगी मालिकेसाठी खेळण्यासाठी अद्याप तंदुरुस्त झालेला नाही तर, मिचेल स्टार्क आणि जॉश हॅजलवुड या आघाडीच्या गोलंदाजांना अवघ्या महिन्याभरावर येऊ ठेपलेल्या विश्वचषकाच्या दृष्टीने या तिरंगी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गुरिंदरचा तिरंगी मालिकेत समावेश करण्यात आला असून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी या मालिकेतून गुरिंदरकडे चालून आली आहे.