युरो कप २०२० स्पर्धेत इटलीने विजयी सलामी दिल्यानंतर आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंग चढू लागला आहे. यूरोपियन देशात फुटबॉल सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे त्याचे चाहते फुटबॉलसाठी काहीही करण्यास तयार असतात. मग ते फुटबॉलचं मैदान असो की, प्रेक्षक गॅलरी चाहत्यांचा वेडेपणा पाहायला मिळतो. पण पोलंडमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान विचित्र घटना घडल्याचं पाहायला मिळाली. फुटबॉलचा सामना ऐन रंगात असताना मैदानात पॅराशूट उतरलं आणि काही काळ खेळ थांबवावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पॅराशूटचं इमर्जन्सी लँडिग मैदानाच्या अगदी मध्यावर करण्यात आलं.

पोलंडमध्ये ६ जून रोजी ऑलिम्पिया एलब्लग रिझर्व्ह आणि पिसा प्रीमेवरा बार्सेझो या दोन संघामध्ये फुटबॉलचा सामना रंगला होता. सामना ऐन रंगात आला असताना ही घटना घडली. फुटबॉल खेळण्यात दंग असलेल्या खेळाडूंना सर्वप्रथम काय झालं कळलंच नाही. मैदानात एकच आरडाओरड सुरू झाला. पॅराशूट आपल्या दिशेने येताना पाहाताच खेळ काही काळ थांबला आणि खेळाडूंची पळापळ सुरु झाली. हा सर्व प्रसंग पॅराशूटमध्ये असलेली व्यक्ती शूट करत होती. पॅराशूटवरचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. मैदानात लँडीग होत असताना तो ‘पळा पळा’ असं तो ओरडत होता. ही घटना घडल्यानंतर मॅच रेफरी जवळ आला आणि त्याने पॅराशूटमधील व्यक्तीला पिवळं कार्ड दाखवलं. यामुळे मैदानात एकच हशा उडाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला हजारो नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्याचबरोबर मजेशीर कंमेट्सचा पाऊस पाडत आहेत.

दुसरीकडे यूरो चषक स्पर्धेची रंगत वाढू लागली आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत आज रशियासमोर बलाढय़ बेल्जियमचे आव्हान असणार आहे. रशियाविरुद्धच्या याआधीच्या सातही सामन्यांत अपराजित राहणाऱ्या बेल्जियमचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे. तर ब-गटात डेन्मार्कची लढत फिनलँडशी होणार आहे. डेन्मार्क संघात दमदार खेळाडूंचा भरणा असल्यामुळे या सामन्यात त्यांची बाजू वरचढ ठरू शकते. डेन्मार्कने फिनलँडविरुद्धच्या गेल्या ५९ सामन्यांपैकी ३८ सामने जिंकले आहेत.