इंग्लंड विरुद्ध उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची रणनिती ठरवण्यासंदर्भात आज टीम इंडियाच्या खेळाडूंची बैठक झाली. या बैठकीत नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरु आहे, त्यावर चर्चा झाली. प्रत्येक खेळाडूने आपले मत मांडले, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सांगितले. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी कोहलीने मीडियाशी ऑनलाइन संवाद साधला. शेतकरी आंदोलनासंदर्भात नेमकी काय चर्चा झाली ? त्याबद्दल कोहलीने सविस्त माहिती देण्याचे टाळले.

मागच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारला, त्यावर कोहली म्हणाला की, “संघाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. प्रत्येकाने या मुद्यावर आपले मत मांडले.” आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टि्वट केलं. त्यानंतर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी देशाच्या एकजुटीचा नारा देणारे टि्वट केलं.

“मतभेदाच्या या काळात आपण सर्व एकत्र राहूया. शेतकरी आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहेत. शांततेसाठी आणि पुढे जाण्यासाठी सर्व पक्ष सौहार्दपूर्ण तोडगा शोधून काढतील, याची मला खात्री आहे.” असे टि्वट विराट कोहलीने केले होते.

सचिन तेंडुलकर म्हणाला….
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त बाहेरुन पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल निर्णय घेतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले आहे. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.