भारताने सलग दोन एकदिवसीय मालिका गमवल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी टीकेचा धनी ठरत आहे. त्याचबरोबर त्याला गेल्या काही सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी फलंदाजीही करता आलेली नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माइक हसीने मात्र धोनीची पाठराखण केली आहे. कर्णधारपदासाठी धोनीच योग्य असल्याचे मत हसीने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने सलग चार सामने गमावले आहेत. यापूर्वी घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेत भारताला पराभूत केले होते. तसेच बांगलादेश दौऱ्यातही भारताने एकदिवसीय मालिका गमावली होती.
‘‘बऱ्याच कालावधीपासून धोनीने भारताचे नेतृत्व सांभाळले आहे आणि तोच या पदासाठी योग्य व्यक्ती आहे. संघाचे कर्णधारपद भूषवणे हे सोपे काम नाही. तुम्हाला प्रत्येकवेळी धडाकेबाज फलंदाजी करता येत नाही. विचार करणारे चांगले गोलंदाज येत आहेत. त्यामुळे त्यांचा सामना करणे सोपी गोष्ट राहीलेली नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला मोठी खेळी सकारता येणार नाही,’’ असे हसी म्हणाला.
युवा खेळाडूंना धोनीकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, असे हसीला वाटते. ‘‘आतापर्यंत बऱ्याचदा धोनीने भारताच्या विजयात योगदान दिले आहे. पण प्रत्येक वेळी तो मोठी खेळी साकारेल, अशी अपेक्षा करता कामा नये. युवा खेळाडूंनी त्याच्यासोबत फलंदाजी करणे आदर्शवत ठरेल. कोणत्या परिस्थितीत कसे खेळावे, हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे,’’ असे तो म्हणाला.
भारताच्या कामगिरीबद्दल हसी म्हणाला, ‘‘या मालिकेत भारताने चांगला खेळ केला आहे. सातत्याने मालिकेत तिनशेच्या वर धावा केल्या आहेत. हे चांगल्या कामगिरीचे लक्षण आहे. ऑस्ट्रेलियामध्ये येऊन अशी कामगिरी करणे सोपी गोष्ट नाही. प्रत्येक सामना हा अटीतटीचा झाला व ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केले. भारताने कामगिरीत सातत्य ठेवल्यास त्यांच्यापासून विजय दूर नसेल.’’

मॅक्सवेल पाचव्या लढतीला मुकणार?
कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला दुखापत झाल्यामुळे भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. चौथ्या सामन्यात मॅक्सवेलच्या गुडघ्याला दुखापत झाली. इशांत शर्माचा चेंडू मॅक्सवेलच्या उजव्या गुडघ्याला लागला, त्या वेळी तो १३ धावांवर होता. मात्र तरीही त्याने सहा चौकार आणि एका षटकारासह २० चेंडूंत ४१ धावा केल्या.