अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या नंतर भारतीय संघात फिरकीची जागा कोण चालवणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या कामगिरीमुळे भारताचा हा प्रश्न कायमचा निकाली निघाला. परंतु आगामी वर्षांमध्ये रविचंद्रन अश्विनला भारताच्या वन-डे संघात जागा मिळवणं कठीण होईल, असं मत हरभजन सिंहने व्यक्त केलं आहे. बीसीसीआय आगामी काळात खेळाडूंच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देणार आहे, त्यामुळे फिटनेसच्या निकषावर अश्विनला संघात पुनरागमन करणं कठीण होणार होईल असं हरभजन सिंहने म्हणलं आहे.

“इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडकात मी स्वतः सामने पहायला हजर होतो. यावेळी जाडेजा आणि अश्विनची गोलंदाजी पाहून आगामी काळात त्यांना चांगल्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण कठीण होऊन बसणार आहे, असा विचार माझ्या मनात आला होता. दोन्ही खेळाडूंनी तुलना केली तर रविंद्र जाडेजा हा अधिक चांगला खेळाडू आहे. जाडेजा हा चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करतोच, मात्र तो एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. या बाबतीत अश्विन थोडा कमी पडतो, त्यामुळे यापुढे अश्विनऐवजी जाडेजाला वन-डे संघात जागा मिळण्याची शक्यता अधिक आहे.”

अवश्य वाचा – सर जाडेजांवर कुरघोडी, बांगलादेशचा शाकिब अल हसन सर्वोत्तम अष्टपैलू

गेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी मोठ्या प्रमाणात धावा कुटल्याचं पहायला मिळालं. याचसोबत अश्विन क्षेत्ररक्षणातही इतका उजवा नसल्याचं अनेक वेळा पहायला मिळालं आहे. नुकत्याच श्रीलंका दौऱ्याआधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये युवराज आणि सुरेश रैना हे खेळाडू अनफीट ठरले होते. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देणार हे आता उघड झालेलं आहे. त्यामुळे आगामी काळात या कठीण निकषांवर अश्विन कसा काम करतो आणि हरभजन सिंहने अश्विनबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरते का हे पहावं लागणार आहे.